श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उच्च वेतनावरील निवृत्तीवेतनासंदर्भातील 3.1 लाखांपेभा अधिक प्रलंबित अर्जांशी संबंधीत वेतन तपशील इत्यादी अपलोड करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून नियोक्त्यांना 31 जानेवारी 2025 पर्यंत अखेरची संधी


कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ज्या 4.66 लाख प्रकरणांमध्ये स्पष्टीकरण मागितले आहे, त्यावर नियोक्त्यांनी 15 जानेवारी 2025 पर्यंत आपला प्रतिसाद /अद्यायावत माहिती सादर करावी अशी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची विनंती

Posted On: 18 DEC 2024 4:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2024

 

उच्च वेतनावरच्या निवृत्तीवेतन पर्याय /संयुक्त पर्यायांच्या वैधतेसाठी अर्ज सादर करण्याकरता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO - Employees' Provident Fund Organisation) वतीने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली गेली होती. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 04 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करत, पात्र निवृत्तीवेतन धारकांसाठी /सदस्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली गेली होती. दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी या सुविधेचा प्रारंभ केला होता, तेव्हापासून 03 मे 2023 पर्यंत ही वापरासाठी उपलब्ध राहणार होती. मात्र यासंदर्भात मुदत वाढ मिळावी याकरता कर्मचाऱ्यांच्या वतीने सादर झालेल्या निवेदनांना विचारात घेऊन पात्र निवृत्तीवेतन धारकांना  /सभासदांना अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण चार महिन्यांची मुदत उपलब्ध करून देता यावी म्हणून  ही मुदत 26 जून 2023 पर्यंत वाढवून दिली गेली होती.

त्यानंतर पात्र निवृत्तीवेतन धारकांना /सभासदांना येणाऱ्या अडचणी दूर करता याव्यात यासाठी अखेरची संधी म्हणून 15 दिवसांची संधीही दिली गेली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी पर्याय /संयुक्त पर्यायांच्या वैधतेसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2023 पर्यंत वाढवली गेली. त्यानुसार निवृत्तीवेतन धारकांकडून /सदस्यांकडून वाढवल्या गेलेल्या मुदतीपर्यंत म्हणजे 11 जुलै 2023 पर्यंत पर्याय /संयुक्त पर्यायांच्या वैधतेसाठी एकूण 17.49 लाख अर्ज प्राप्त झाले होते.

त्यानंतरही नियोक्ता आणि नियोक्ता संघटनांकडून अर्जदार निवृत्तीवेतन धारकांचे /सदस्यांचे वेतन तपशील अपलोड करण्यासाठीची मुदत वाढवून देण्याची विनंती करणारी निवेदने प्राप्त झाली होती. त्यानुसार नियोक्त्यांना आधी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, त्यानंतर पुन्हा 31 डिसेंबर  2023 पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा 31 मे 2024 पर्यंत वेतन तपशील इत्यादी ऑनलाइन सादर करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊन संधी दिली गेली होती. प्राप्त झालेल्या अर्जांवर प्रक्रिया करण्याकरता नियोक्ता सक्षम व्हावेत या उद्देशानेच या संधी दिल्या गेल्या होत्या.

मात्र इतक्यांदा मुदतवाढ दिल्यानंतरही, पर्याय /संयुक्त पर्यायांच्या  वैधतेसाठी प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी 3.1 लाखांहून जास्त अर्ज अजूनही नियोक्तांकडे प्रलंबित असल्याचे निदर्शनाला आले आहे. यासोबतच नियोक्ता आणि नियोक्ता संघटनांकडून अनेक निवेदने प्राप्त झाली असून, या निवेदनांच्या माध्यमातून नियोक्ता आणि नियोक्ता संघटनां अर्जदार निवृत्तीवेतन धारकांचे  /सदस्यांचे वेतन तपशील अपलोड करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे.

विद्यमान परिस्थिती आणि त्याअनुषंगाने प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून नियोक्त्यांनी पर्याय /संयुक्त पर्यायांच्या वैधतेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी प्रलंबित असलेल्या अर्जांवर प्रक्रिया करून ती अपलोड करण्याची सुनिश्चिती करण्याकरता अखेरची संधी म्हणून नियोक्त्यांना 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली जात आहे.

यासोबतच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (EPFO - Employees' Provident Fund Organisation) प्राप्त झालेल्या आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने तपासलेल्या अर्जांपैकी ज्या 4.66 लाखांपेक्षा जास्त अर्जांच्या संदर्भात अतिरिक्त माहिती /स्पष्टीकरण मागितले आहे अशा प्रकरणांच्या बाबतीतही नियोक्त्यांनी 15 जानेवारी 2025 पर्यंत आपले प्रतिसाद /अद्ययावत माहिती सादर करावी अशी  विनंती केली आहे.

 

* * *

S.Tupe/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2085632) Visitor Counter : 67