निती आयोग
azadi ka amrit mahotsav

भारताचे बहुक्षेत्रीय संक्रमणः मोठ्या गुंतवणुकीला रेटा देण्यासाठी अर्थसाहाय्य

Posted On: 17 DEC 2024 11:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 डिसेंबर 2024

 

नीती आयोगाने बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि इंदिरा गांधी इन्स्टिट्युट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च (IGIDR) यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या, भारताचे बहुक्षेत्रीय संक्रमणः मोठ्या गुंतवणुकीला रेटा देण्यासाठी अर्थसाहाय्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचा आज मुंबईत समारोप झाला. या कार्यशाळेत नामवंत आंतरराष्ट्रीय विद्वान, भारतीय शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ञ वाढीव आर्थिक स्रोतांच्या एकत्रिकरणाच्या माध्यमातून भारताच्या विकासाला गती देण्याच्या धोरणांचा शोध घेण्यासाठी एकत्र आले.  

गेल्या दोन दशकांमध्ये भारताच्या विकासाची वाटचाल अतिशय उल्लेखनीय राहिली आहे, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के बेरी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले. 2014 मध्ये  10 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्यापासून ते आजच्या काळात पाचव्या क्रमांकावर पोहोचणे या दरम्यानचा प्रवास जागतिक आणि प्रादेशिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अतिशय वेगवान म्हणावा लागेल, असे त्यांनी सांगितले. संरचनात्मक सुधारणांनी  हे सुनिश्चित केले की राजकीय स्थैर्य, देशांतर्गत मध्यम वर्गाच्या वाढलेल्या क्रयशक्तीमुळे उपभोगात वाढ, सरकारकडून पायाभूत सुविधांना भक्कम रेटा आणि शाश्वत राजकोषीय आरोग्य आणि अतिशय सक्रीय स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्या बळावर भारत जागतिक स्तरावर गुंतवणुकीसाठी आकर्षक गंतव्य स्थान राहील.  

आपल्या बीजभाषणात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन् यांनी सांगितले की 2047 पर्यंत भारताचा उच्च-उत्पन्न असलेली अर्थव्यवस्था बनण्याचा प्रवास देशांतर्गत बचत, आर्थिक बाजारपेठ अधिक सखोल करणे आणि नवोन्मेष आणि शाश्वततेमध्ये परिवर्तनशील गुंतवणूक करण्यावर अवलंबून आहे. धाडसी धोरणे आणि सामूहिक महत्त्वाकांक्षेने भारत आव्हानांना संधींमध्ये बदलू शकतो आणि जागतिक आर्थिक शक्तीस्थान बनू शकतो, असे ते म्हणाले.

आयजीआयआरडी चे संचालक आणि कुलगुरु डॉ. बसंत प्रधान या संवादात सहभागी होताना म्हणाले की 2047 पर्यंत  विकसित देश बनण्याची भारताची महत्त्वाकांक्षा हे एक उल्लेखनीय लक्ष्य आहे. ते साध्य करण्यासाठी 7 ते 8 टक्के दराने एक शाश्वत जीडीपी वृद्धी प्रदीर्घ काळासाठी गरजेची आहे.

या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे नामवंत शिक्षणतज्ञ डॉ. डोनाल्ड हॅना हेही सहभागी झाले . चर्चेदरम्यान, डॉ. हॅना म्हणाले  की, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे आणि आता सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, संसाधनांच्या वापराच्या अधिक शाश्वत पद्धतीवर उत्पन्नाच्या उच्च स्तरावर संक्रमणाचे व्यवस्थापन करण्यात भारताचे यश हे जागतिक कल्याणासाठी मूलभूत महत्त्वाचे आहे आणि असेल.

या कार्यशाळेत मोठ्या गुंतवणुकीला रेटा देण्यासाठी अर्थसहाय्य करण्यासाठीच्या पर्यायांवर एक संशोधन विषयपत्रिका तयार करण्याच्या विविध पैलूंवर भर देणाऱ्या तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले.  

या परिषदेत चार अंतर्दृष्टीपूर्ण तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली ज्यामध्ये बृहदआर्थिक व्यवस्थापन आणि भारताचे  बहुक्षेत्रीय संक्रमण, भांडवली व्यवहारांचे उदारीकरण यांचा समावेश होता.

 

* * *

JPS/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2085618) Visitor Counter : 19


Read this release in: English , Hindi , Kannada