लोकसभा सचिवालय
भारत आणि आर्मेनिया यांच्यातील संवाद आणि सहकार्याने भागीदारीची नवी दालने खुली झाली आहेत : लोकसभा अध्यक्ष
स्थिर सरकार आणि व्यवसाय सुलभतेमुळे भारतात गुंतवणुकीच्या अमाप संधी निर्माण झाल्या आहेत : लोकसभा अध्यक्ष
Posted On:
17 DEC 2024 9:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2024
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज आर्मेनियाच्या नॅशनल ऍसेंब्लीचे अध्यक्ष ऍलेन सिमोन्यान यांच्यासोबत संसद भवन संकुलात द्विपक्षीय चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणुकीसह दोन्ही बाजूंनी परस्पर हिताच्या विविध मुद्यांवर चर्चा केली.
अलीकडच्या काही वर्षात दोन्ही देशांदरम्यान राजकीय आणि संसदीय संवाद आणि सहकार्यात वाढ झाली असल्याने विविध क्षेत्रातील भागीदारीची नवी दालने खुली झाली असल्याचे बिर्ला यांनी नमूद केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकारमुळे भारत जगातील सर्वोच्च आर्थिक विकास दरावर झेप घेत असल्याची माहिती त्यांनी भारत भेटीवर आलेल्या आर्मेनियन संसदीय शिष्टमंडळाला दिली. भारतामध्ये व्यवसाय सुलभता आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे भारताविषयी जगभरात अतिशय मोठ्या प्रमाणात स्वारस्य निर्माण झाले असल्याचे देखील त्यांनी अधोरेखित केले.
बहुपक्षीय मंचावर दोन्ही देशांमध्ये सातत्यपूर्ण संवाद आणि सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले की दोन्ही देश आणि दोन्ही देशांच्या संसदेदरम्यान प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर नियमित चर्चा द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करतील. भारत आणि आर्मेनिया यांच्यातील सखोल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर भर देत त्यांनी अशी आशा व्यक्त केली की वाढत्या द्विपक्षीय सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील लोकांचे संबंध बळकट होतील.
भारत लोकशाहीची जननी असल्याचे सांगत लोकशाहीच्या मध्यवर्ती सिद्धांतांना भक्कम करण्यासाठी भारत आणि आर्मेनिया यांच्या संसदांमधील सहकार्य अधिक बळकट करण्यावर त्यांनी भर दिला.
भारताने नेहमीच लिंग समानतेचा पुरस्कार केला असल्याचे सांगत बिर्ला यांनी या शिष्टमंडळाला माहिती दिली की या संसदेच्या नव्या इमारतीमध्ये जो पहिला कायदा संमत झाला तो नारी शक्ती वंदन कायदा होता, ज्याने देशातील महिला प्रणीत विकासाच्या वचनबद्धतेला बळकटी दिली आहे.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2085480)
Visitor Counter : 29