लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना ‘टीबी - मुक्त भारत’ अभियानाला ‘जन-आंदोलन’ बनवण्याचे केले आवाहन

Posted On: 15 DEC 2024 6:43PM by PIB Mumbai

 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सर्व खासदारांना  'टीबी मुक्त भारत' आणि 'नशा मुक्त भारत' अभियानांना 'जन-आंदोलन' बनवण्याचे तसेच भारताला 2025 पर्यंत क्षयरोग (टीबी) मुक्त करण्यासाठी आपापसात निकोप  स्पर्धेची भावना विकसित करण्याचे आवाहन केले.

आज नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे सर्व राजकीय पक्षांमधील खासदारांमधील मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे उद्घाटन  बिर्ला यांच्या हस्ते झाले. 'टीबी मुक्त भारत' आणि 'नशा मुक्त भारत' मोहिमेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. क्षयरोग (टीबी) आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाविरूद्धच्या आपल्या लढ्याच्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे जनजागृती आणि जनसहभाग असल्याचे बिर्ला याप्रसंगी बोलताना म्हणाले.

निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी क्षयरोग आणि अंमली पदार्थांच्या व्यसन मुक्तीची  गरज लोकसभा अध्यक्षांनी अधोरेखित केली. बिर्ला यांनी आपल्या भाषणातून ‘निकोप स्पर्धे’ची भावना जागृत केली. यामुळे सर्व संसदीय  मतदारसंघ क्षयमुक्त होण्यासाठी स्पर्धा करतील, आणि क्षयमुक्त भारताचे ध्येय साध्य होईल, असे ते म्हणाले.

क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी लोकसभा अध्यक्षांनी अधोरेखित केली. लोकप्रतिनिधींनी सामाजिक कार्यक्रम आणि सरकारने आयोजित केलेल्या रोग प्रतिबंधक उपक्रमांमध्ये योगदान देणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. रोग प्रतिबंध आणि रुग्णांची आजारपणानंतरची काळजी घेण्यासाठी खासदारांनी  त्यांच्या अनुभवाचा वापर करण्याची सूचना बिर्ला यांनी केली. 

क्षयरोग (टीबी) हा एक असा आजार आहे जो लोकांसाठी, विशेषतः गरीबांसाठी कठीण आव्हाने आणि अडचणी निर्माण करतो.  या आव्हानांवर मात करण्यासाठी राष्ट्रीय निर्धाराची  गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी नमूद केले की, जागतिक आरोग्य संघटनेने 2030 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे जागतिक लक्ष्य ठेवले आहे, परंतु पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने 2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे अधिक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. बिर्ला पुढे म्हणाले की, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व खासदारांचे  सहकार्य महत्त्वाचे आहे, कारण ते  भारतातील १.४ अब्ज लोकांचे प्रतिनिधित्व करतात. 2025 पर्यंत भारत क्षयमुक्त होईल याची खात्री करण्यासाठी संकल्प-बद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन अध्यक्षांनी केले.

क्षयरोग निर्मूलनाचा पुढाकार संसदेने घेतला आहे आणि तो यशस्वीपणे पुढे नेणे ही संसदेतील सदस्यांची जबाबदारी आहे, असे नमूद करत  बिर्ला म्हणाले की, भारताच्या लोकशाही संरचनेत, पंचायतीपासून संसदेपर्यंत, निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचा समावेश होतो, त्या सर्वांनी  पूर्ण निर्धाराने काम करून हे ध्येय साध्य केले पाहिजे.

भारताला क्षयरोग आणि अंमली पदार्थांच्या व्यसननापासून मुक्त करण्याबाबत जन जागृती करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि हमीरपूर, हिमाचल प्रदेश येथील खासदार अनुराग सिंह  ठाकूर यांनी 20 षटकांचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना हा  एक उपक्रम  म्हणून आयोजित केला.

लोकसभा अध्यक्ष इलेव्हन संघाचे नेतृत्व अनुराग सिंह ठाकूर यांनी केले, तर राज्यसभा सभापती इलेव्हन संघाचे नेतृत्व किरेन रिजिजू यांनी केले. लोकसभा अध्यक्ष इलेव्हन संघाने 73 धावांनी विजय मिळवला. 111 धावांच्या नाबाद खेळीसाठी अनुराग सिंह ठाकूर यांना सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

***

S.Kane/S.Mukhedkar/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2084645) Visitor Counter : 42


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil