आयुष मंत्रालय
10 वी जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शनाचे आज डेहराडूनमध्ये उद्घाटन
Posted On:
12 DEC 2024 10:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2024
केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत आज 10 व्या जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शनाचे डेहराडून येथे उद्घाटन झाले. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ शेखर मांडे हे देखील यावेळी उपस्थित होते.
आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की डिजिटल आरोग्यावर चर्चा करण्यासाठी हजारो लोक येथे जमले आहेत. ही 10 वी जागतिक आयुर्वेद परिषद एक निर्णायक टप्पा आहे जिथे विचारधारा, संस्कृती आणि नवोन्मेष मधील विविध प्रवाह एकत्र येतात.
या द्विवार्षिक कार्यक्रमाचे आयोजन जागतिक आयुर्वेद फाउंडेशनच्या वतीने केले जाते, जो विज्ञान भारतीचा एक उपक्रम आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाची यावर्षीची आवृत्ती जगभरातील आयुर्वेद अभ्यासक, संशोधक आणि उत्साही लोकांना एकत्र आणण्यासाठी सज्ज आहे. आयोजक अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी 5500 हून अधिक भारतीय प्रतिनिधी आणि 54 देशांमधील 350 हून अधिक प्रतिनिधींनी सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. या कार्यक्रमात पूर्ण सत्रांव्यतिरिक्त 150 हून अधिक वैज्ञानिक सत्रे आणि 13 सहयोगी कार्यक्रम असतील.
जागतिक आयुर्वेद परिषद 2024 ची मध्यवर्ती संकल्पना "डिजिटल आरोग्य : एक आयुर्वेद दृष्टीकोन," अशी असून आयुर्वेदाला चालना देण्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिवर्तनात्मक क्षमतेचा शोध घेईल. या कार्यक्रमात आरोग्य सेवा वितरण वाढविण्यासाठी, संशोधनाला पुनर्परिभाषित करण्यासाठी आणि वेगाने विकसित होत असलेल्या जागतिक आरोग्य परिदृश्यामध्ये आयुर्वेदाला समाकलित करण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल साधने आणि अभिनव कल्पनांचा लाभ घेण्यासाठी विचारमंथन आणि माहितीची देवाणघेवाण समाविष्ट असेल. या कार्यक्रमात तांत्रिक सत्रे, पॅनेल चर्चा, पूर्ण आणि वैज्ञानिक सत्रे, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे संमेलन, आरोग्य मंत्र्यांचे संमेलन, गुंतवणूकदारांची बैठक आणि सॅटेलाईट सेमिनार देखील असतील. आधुनिक काळातील वैविध्यपूर्ण आरोग्य सेवा आव्हानांसाठी आयुर्वेदिक उपायांवरही यात चर्चा केली जाईल.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2083993)
Visitor Counter : 53