वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि नॉर्वे यांनी प्रस्थापित केली घनिष्ठ आर्थिक भागीदारी, व्यावसायिक सहकार्यविषयक आव्हानांची करत आहेत हाताळणी आणि परस्परांना पूरक असलेल्या संबंधित क्षेत्रांमधील वृद्धीच्या संधीचा घेत आहेत शोध


पुढील मंत्रिस्तरीय बैठकीदरम्यान पीयूष गोयल दोन्ही देशांदरम्यान स्टार्ट-अप सेतूचा करणार शुभारंभ

Posted On: 08 DEC 2024 9:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2024

भारत-नॉर्वे व्यापार मंचाच्या बैठकीचे रविवारी 8 डिसेंबर 2024 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आले. भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय), भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या  उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) सहकार्याने या बैठकीचे आयोजन केले होते. या मंचावर भारत-नॉर्वे व्यापार आणि गुतवणूक संबंधांना प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रात बळकटी देण्याच्या संधीबाबत चर्चा करण्यासाठी धोरणकर्ते, उद्योग धुरीण आणि हितधारकांना एकत्र आणण्यात आले.

वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली एका खुल्या संवादाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये नियामक आव्हाने, सार्वजनिक खरेदीविषयक समस्या आणि विविध क्षेत्रातील अनुपालनाचे निकष,  यांच्यासह प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यात आली. सागरी क्षेत्र, नौवहन, ऊर्जा, अन्न प्रक्रिया, मालवाहतूक व्यवस्थापन, तेल आणि वायू, नवीकरणीय ऊर्जा आणि चक्राकार अर्थव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील समस्या मंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. पीयूष गोयल यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकविषयक संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी संबंधित मंत्रालयांसोबत एकत्रितपणे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली. पुढील मंत्रिस्तरीय बैठकीदरम्यान त्यांनी नॉर्वे आणि भारत यांच्यात स्टार्टअप सेतू सुरू करण्याचा प्रस्ताव देखील मांडला. पुढील वर्षी होणाऱ्या इंडो-नॉर्डिक शिखर परिषदेदरम्यान हा उपक्रम सुरू केला जाऊ शकतो, असे राजदूतांनी सुचवले.  या संवादानंतर  नॉर्वेजियन व्यापार आणि उद्योग मंत्री सेसिल मायर्सेथ, यांचा व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला. यामध्ये त्यांनी गोलमेज चर्चेसाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि टीईपीए करारांतर्गत नॉर्वेजियन कंपन्यांमध्ये भारतात आपल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी असलेल्या क्षमतांना अधोरेखित केले.

 पीयूष गोयल यांच्या भाषणाने या सत्राचा समारोप झाला. गोयल यांनी भारतामधील गुंतवणुकीसाठी असलेल्या भक्कम परिदृश्याकडे लक्ष वेधले.आंतरराष्ट्रीय भागीदारांना आकर्षित करणाऱ्या संधी भारतात विपुल प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले.भारतामध्ये उपलब्ध असलेले युवा, गतिशील मनुष्यबळ, भक्कम लोकशाही संस्था, वाढत असलेली ग्राहक बाजारपेठ णि निर्णयक्षम राष्ट्रीय नेतृत्व यांसारख्या भारताच्या धोरणात्मक लाभांना त्यांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर भारत म्हणजे अतिशय आकर्षक जागतिक गुंतवणूक केंद्र असल्यावर भर देत त्यांनी भारतामधील स्थानिक प्रतिभेचा वापर केवळ देशांतर्गत संधींसाठीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजाराच्या विस्ताराचा एक आधार म्हणून करण्यासाठी नॉर्वेजियन कंपन्यांना आमंत्रित केले.

त्यापूर्वी डीपीआयआयटीच्या संयुक्त सचिव गुरनीत तेज यांनी या मंचाचे उद्घाटन केले आणि  दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 1.1 अब्ज डॉलरवर पोहोचला असल्यावर आणि नॉर्वे हा भारतामधील सर्वात जास्त गुंतवणूक करणारा 33 वा देश असल्यावर भर देत  वृद्धिंगत होणाऱ्या भारत-नॉर्वे भागीदारीला अधोरेखित केले. त्यांनी नील अर्थव्यवस्था, हरित हायड्रोजन, नवीकरणीय ऊर्जा, मत्स्योद्योग आणि जल व्यवस्थापन यांच्यासारख्या सहकार्याच्या क्षेत्रांवर भर देताना भारताच्या पायाभूत सुविधा विकासामध्ये नॉर्वेच्या वाढत्या सहभागाकडे लक्ष वेधले. अलीकडेच भारत आणि युरोपीय मुक्त व्यापार संघटना (ईएफटीए) यांच्यात करण्यात आलेला ट्रेड अँड इकॉनॉमिक पार्टनरशिप ऍग्रीमेंट(टीईपीए) हा करार म्हणजे आर्थिक सहकार्याला बळकटी देणारे एक महत्त्वाचे पाऊल असल्याची प्रशंसा करण्यात आली.

नॉर्वेचे भारतातील राजदूत मे-एलीन स्टेनर यांनी टीईपीए करार म्हणजे द्विपक्षीय संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले आणि भावी काळात दोन्ही देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणूकीत वाढ करण्यासाठी या कराराची क्षमता अधोरेखित केली. 2025 पर्यंत हा करार अंमलात आणण्याच्या नॉर्वेच्या योजनेची त्यांनी माहिती दिली आणि नवीकरणीय ऊर्जा, सागरी उद्योग, हवामान आणि शाश्वतता यांसारख्या प्रमुख क्षेत्रांवर भर दिला. 2025 मध्ये नॉर्वे इंडो-नॉर्डिक शिखर परिषद आयोजित करेल, अशी घोषणा देखील त्यांनी केली. या मंचावर इनोव्हेशन नॉर्वेच्या बिझनेस क्लायमेट सर्व्हेचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये नॉर्वेजियन कंपन्यांचा भारतावरील वाढता विश्वास दर्शवण्यात आला. अनेक कंपन्यांनी भारतातील सुधारित व्यावसायिक वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले आणि देशातील कामकाजाचा विस्तार करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. या मंचाने भारतीय आणि नॉर्वेजियन उद्योगांमध्ये रचनात्मक संवादासाठी एक व्यासपीठ देखील उपलब्ध केले,ज्यामुळे ऊर्जा, सागरी क्षेत्र आणि शाश्वतता यासारख्या क्षेत्रांमध्ये समन्वय आणि सामायिक आव्हानांचा शोध घेण्याच्या संधींकडे लक्ष वेधले गेले. यावेळी या मंचामध्ये सहभागी झालेल्या उपस्थितांनी  सहकार्य बळकट करण्याच्या, गुंतवणूक वाढवण्याच्या आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर चर्चा केली.

भारत-नॉर्वे व्यापार मंच दोन्ही देशांची भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि शाश्वत वृद्धी आणि विकास साध्य करण्यासाठी सहकार्याने काम करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहे.

 
Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2082296) Visitor Counter : 25


Read this release in: Urdu , English , Hindi