अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उपेक्षित समुदायांना उद्योजकतेद्वारे सक्षम बनवण्यासाठी एनएमडीएफसी आणि डिक्की यांनी केली सामंजस्य करारावर स्वाक्षरी


एनएमडीएफसी आणि डिक्की यांच्यातील सहकार्य हे आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल  :  किरेन रिजिजू

Posted On: 07 DEC 2024 7:42PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय अल्पसंख्यक विकास आणि वित्त महामंडळ  (एनएमडीएफसी) आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) यांनी आज उपेक्षित समुदायांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथील नालंदा हॉल येथे केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज मंत्री  किरेन रिजिजू यांच्या  उपस्थितीत हा समारंभ झाला.

या सहयोगामुळे  सर्वसमावेशक वाढ आणि आत्मनिर्भरतेला  चालना देण्यासाठी एनएमडीएफसी आणि डिक्की यांचे कौशल्य आणि संसाधने यांचा मेळ साधत अल्पसंख्याक आणि उपेक्षित समुदायांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणाला एक नवीन आयाम जोडला जाईल, अशी अपेक्षा आहे. याप्रसंगी बोलताना मंत्री  किरेन रिजिजू यांनी सांगितले,  “एनएमडीएफसी आणि डिक्की यांच्यातील हे सहकार्य म्हणजे आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन आम्ही व्यक्तींना रोजगार निर्माते आणि रोल मॉडेल बनण्यासाठी सक्षम करत आहोत, देशभरातील जीवन आणि समुदाय यांच्यात बदल घडवून आणत आहोत.”

डिक्कीचे अध्यक्ष  पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे  यांनी उपेक्षित समुदायामध्ये उद्योजकता वाढावी तसेच त्यांच्यामधील व्यावसायिक व्यक्तींना मार्गदर्शन व्हावे, यासाठी केंद्रीय मंत्री  किरेन रिजिजू यांनी एनएमडीएफसी आणि डिक्की यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.अशा व्यक्तींना एनएमडीएफसीच्या सोबतीने मदत करण्यासाठी आणि त्यांना साहाय्य  करण्यासाठी डिक्की कटिबद्ध आहे, जेणेकरून ते सरकारकडून नोकऱ्या मागण्याऐवजी नियोक्ते बनतील, अशी ग्वाही कांबळे यांनी दिली.

सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून, डिक्कीने मान्यता दिलेल्या उद्योजकांना एनएमडीएफसी‌कडून सवलतीने कर्ज दिले जाईल, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय स्थापित होण्यास मदत होईल आणि आर्थिक वाढीस हातभार लागू शकेल. शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे आणि धोरणात्मक सुधारणांसाठी पाठबळ देणे  हीदेखील या सहयोगाची संकल्पना आहे.

***

S.Kakade/N.Mathure/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2082044) Visitor Counter : 42


Read this release in: English , Urdu , Hindi