संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्र्यांनी लोकांना सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदारपणे योगदान देण्याचे केले आवाहन
"आपल्या सेवारत आणि निवृत्त सैनिकांचे तसेच त्यांच्या कुटुंबांचे कल्याण सुनिश्चित करणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे”
Posted On:
07 DEC 2024 12:20PM by PIB Mumbai
सेवारत आणि निवृत्त झालेल्या सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे कल्याण सुनिश्चित करणे ही देशाची सामूहिक जबाबदारी आहे, असे सांगत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकांना सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी उदार हस्ते योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त 07 डिसेंबर 2024 रोजी X वरील व्हिडिओ संदेशात, संरक्षणमंत्र्यांनी या दिवसाचे वर्णन, सैनिकांचे अदम्य धैर्य, त्याग आणि समर्पण या प्रती आदर व्यक्त करण्याची तसेच या वीरांप्रती आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या संकल्पाची पुष्टी करण्याची संधी म्हणून केले.
आपले सशस्त्र दल एक अभेद्य सुरक्षा कवच म्हणून काम करते. केवळ बाह्य धोक्यांपासून नव्हे तर नैसर्गिक आपत्तींच्या वेळी देखील, प्रत्येक परिस्थितीत ते आपले संरक्षण करण्यासाठी सदैव तयार असते. त्यांचे बलिदान आणि आपल्या सैनिकांची शिस्त ही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे,” असे राजनाथ सिंह म्हणाले.
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना, संरक्षणमंत्री म्हणाले की, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. सैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरू शकते यावर भर देऊन त्यांनी लोकांना त्यांची भूमिका बजावण्याचे आवाहन केले. समाजाच्या कल्याणासाठी शंभर हातांनी कमावणे आणि हजार हातांनी दान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर शौर्याने लढणाऱ्या शहीद वीरांचा आणि गणवेशातील जवानांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो. युद्ध विधवा, शहीद सैनिकांची मुले आणि अपंगांसह सेवानिवृत्त सैनिक, यांच्या निश्चित केलेल्या वैयक्तिक गरजांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करून संरक्षण मंत्रालयाचा सैनिक कल्याण विभाग त्यांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी काम करत आहे.
***
S.Kakade/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2081947)
Visitor Counter : 38