दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खोटे दूरध्वनी कॉल्स आणि फसवणूक करणाऱ्या कॉल्सची हाताळणी

Posted On: 04 DEC 2024 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 डिसेंबर 2024

 

दूरसंचार विभागाने नागरिकांना सक्षम करण्यासाठी संचार साथी पोर्टल (www.sancharsaathi.gov.in) विकसित केले आहे, ज्यात संशयित फसवणूक संवाद आणि अनाहूत व्यावसायिक संप्रेषण (युसीसी)ची तक्रार करण्याची चक्षू सुविधा आहे. संशयित फसवणूक संप्रेषणाच्या तक्रारींच्या आधारे, दूरसंचार विभाग, मोबाइल कनेक्शन, मोबाइल हँडसेट, घाऊक प्रमाणात एसएमएस पाठवणारे आणि व्हॉट्सॲप खात्यांवर कारवाई करतो. दूरसंचार व्यावसायिक संप्रेषण ग्राहक प्राधान्य विनियम (टीसीसीसीपीआर -2018) नुसार कारवाई करण्यासाठी युसीसी  तक्रारी  दूरसंचार ऑपरेटरना पाठवल्या जातात.

भारतीय मोबाईल नंबर दाखवणारे आणि ते भारतातून आलेले भासवणारे इनकमिंग आंतरराष्ट्रीय बनावट कॉल्स ओळखण्यासाठी आणि ते ब्लॉक करण्यासाठी दूरसंचार विभाग आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांनी, प्रिव्हेंशन ऑफ  स्पूफड इनकमिंग इंटरनॅशनल प्रणाली विकसित केली आहे. बनावट डिजिटल अरेस्ट, फेडेक्स घोटाळे आणि स्वतःला सरकारी आणि पोलिस अधिकारी म्हणवणे इत्यादी प्रकरणांमध्ये सायबर-गुन्हेगारांकडून असे आंतरराष्ट्रीय बनावट कॉल्स केले गेले आहेत.  भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने अनाहूत व्यावसायिक संप्रेषणचा सामना करण्यासाठी पुढील पावले उचलली आहेत :

  1. ट्रायच्या टीसीसीसीपीआर -2018 मध्ये तरतुदी आहेत ज्याद्वारे दूरसंचार ग्राहक सर्व व्यावसायिक संप्रेषणे ब्लॉक करू शकतो किंवा प्राधान्य श्रेणीनुसार व्यावसायिक संप्रेषणे निवडून ब्लॉक करू शकतो आणि मोबाइल ॲपद्वारे शॉर्ट कोड 1909 वर एसएमएस पाठवून आणि 1909 वर कॉल करून युसीसी पाठवणाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवू शकतो.
  2. टीसीसीसीपीआर -2018 चे उल्लंघन केल्याबद्दल नोंदणीकृत संस्था आणि टेलीमार्केटर्सना काळ्या यादीत टाकणे.
  3. बिगर-नोंदणीकृत टेलीमार्केटर विरुद्ध कारवाई उदा. इशारा  देणे, त्यांना युसेज  कॅप अंतर्गत ठेवणे किंवा वारंवार उल्लंघन झाल्यास डिस्कनेक्ट करणे.
  4. स्पॅम कॉल्स  केल्याबद्दल बिगर-नोंदणीकृत  प्रेषकांची सर्व दूरसंचार संसाधने खंडित करण्याचे आणि अशा प्रेषकांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश.
  5. युसीसीला आळा घालण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल ऍक्सेस प्रदात्यांविरुद्ध आर्थिक प्रतिबंध 

दूरसंचार विभागाने 21.11.2024 रोजी दूरसंचार सायबर सुरक्षा नियम, 2024 अधिसूचित केले आहेत ज्यात अशी तरतूद आहे की कोणत्याही व्यक्तीने फसवणूक, खोटे बोलून  किंवा तोतया बनून किंवा फसवणूक करणारा कोणताही संदेश प्रसारित करणे; सुरक्षेला धोका पोहचवणारे कोणतेही कृत्य करणे किंवा तशा हेतूद्वारे दूरसंचार सायबर सुरक्षा धोक्यात आणू शकत नाही.

दळणवळण राज्यमंत्री डॉ. पेमसानी चंद्रशेखर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2080764) Visitor Counter : 40