उपराष्ट्रपती कार्यालय
"युवक हे संसदीय लोकशाहीचे पहारेकरी आहेत" - उपराष्ट्रपती
Posted On:
30 NOV 2024 5:19PM by PIB Mumbai
जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास सिद्ध करण्याचे आणि त्या विश्वासाला न्याय देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी खासदारांना केले आहे. देशातील जनतेच्या अपेक्षा आणि स्वप्नं ही सकारात्मक कृतीद्वारे साकारली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. राजकीय रणनीती म्हणून कामकाजात व्यत्यय आणण्याचा अस्त्र म्हणून उपयोग करण्यावर त्यांनी कठोर टीका केली. उपराष्ट्रपतींनी संसद सदस्यांना जाणीव करून दिली की, देशातील युवक त्यांना पहात असून , लोकशाहीचे पहारेकरी म्हणून काम करत आहेत आणि हे युवक त्यांना जबाबदारही धरणार आहेत.
आज ते अरुणाचल प्रदेशातील रोनो हिल्स, दोईमुख येथे राजीव गांधी विद्यापीठाच्या 22व्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.
भारताच्या जागतिक पातळीवरील अभूतपूर्व प्रगतीबाबत बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की, "समुद्राकडे बघा, जमिनीकडे बघा, आकाशाकडे बघा किंवा अंतराळाकडे बघा.. भारत सातत्याने आगेकूच करत आहे." त्यांनी नमूद केले की भारत हा जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
स्थानिक उत्पादनांच्या प्रोत्साहनासाठी उपराष्ट्रपतींनी नागरिकांना स्वदेशी उद्योगांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, "जर तुम्ही स्थानिक उत्पादनांवर विश्वास दाखवला , तर तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे योगदान देऊ शकता."
आपले भाषण संपवताना, उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना हे लक्षात ठेवण्यास सांगितले की, भारत या महान देशाचे नागरिक होणे हे त्यांचे मोठे भाग्य आहे, विशेषतः अशा काळात जेव्हा भारताला जागतिक स्तरावर आतापर्यंतची सर्वात मोठी ओळख मिळाली आहे.
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2079454)
Visitor Counter : 40