संरक्षण मंत्रालय
हिवाळी सत्र 2024 – दीक्षांत संचलन
Posted On:
30 NOV 2024 4:05PM by PIB Mumbai
भारतीय नौदल अकादमी (आयएनए), एझिमला इथे आज 30 नोव्हेंबर 2024 रोजी हिवाळी सत्राचे दिमाखदार दीक्षांत संचलन पार पडले. या संचलनात एकूण 239 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. आयएनए च्या 107 व्या तुकडीचे प्रशिक्षणार्थी, नौदल अभिमुखता अभ्यासक्रमाच्या (विस्तारित) 38 व 39 व्या तुकडीचे छात्र, 39 वा नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (नियमित) आणि 40 व्या नौदल अभिमुखता अभ्यासक्रमाचे छात्र (तटरक्षक दल व परदेशी) यामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांनी त्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत विशेष पदवी प्राप्त केली. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या छात्रांमध्ये चार देशांमधले 8 परदेशी छात्र व 29 महिला छात्रांचा समावेश आहे.
या संचलनाची मानवंदना नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी स्वीकारली. संचलन पार पडल्यानंतर ॲडमिरल त्रिपाठी यांच्या हस्ते गुणवान छात्रांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान सर्वोत्तम कामगिरी केलेल्या छात्रांना खालील पुरस्कार देण्यात आले.
भारतीय नौदल अकादमीच्या बी. टेक. अभ्यासक्रमासाठीचे राष्ट्रपती सुवर्ण पदक आयुष कुमार सिंग याला मिळाले.
सब लेफ्टनंट रित्विक मिश्रा याला नौदल अभिमुखता अभ्यासक्रम (विस्तिरित) साठी नौदलप्रमुख सुवर्ण पदक तर छात्र सृजन जैन याला एफ ओसी इन सी रौप्य पदक आणि सब लेफ्टनंट सुभाष एस. बोडेकर याला अकादमी कमांडंट कांस्य पदक मिळाले.
39 एनओसी रेजिमेंटच्या सब लेफ्टनंट इशा शहा हिला सीएनएस सुवर्ण पदक आणि अष्टपैलू महिला छात्रासाठीचा झामोरिन चषक मिळाला. अकादमी कमांडंट रौप्य पदक सब लेफ्टनंट माथी नेसिगा टी हिला मिळाले.
तटरक्षक दल महासंचालक सर्वोत्कृष्ट सहाय्यक कमांडंट पुरस्कार सहाय्यक कमांडंट आकाश तिवारी यांना मिळाला.
तळपत्या सुशोभित तलवारी व रायफल हातात घेतलेल्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांनी अकादमीच्या क्वार्टरडेकजवळून जाताना वेग कमी करुन ऑड लँग साइन च्या तालावर कमी वेगाने संचलन करत सलामी दिली. ही जगभरातल्या सशस्त्र दलांची छात्रांना निरोप देण्याची परंपरा असून याला अंतिम पग म्हणजेच भारतीय नौदल अकादमीतले छात्रांचे अखेरचे पाऊल म्हटले जाते.
प्रशिक्षणार्थ्यांनी मिळविलेले निर्विवाद यश व दिमाखदार संचलन यासाठी नौदलप्रमुखांनी त्यांचे अभिनंदन केले. या छात्रांच्या पालकांनी सशस्त्र दलासारखे सन्माननीय क्षेत्र निवडण्यात आपल्या पाल्याला मदत केल्याबद्दल त्यांनी पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या देशसेवेप्रती असलेल्या निष्ठेचा आवर्जून उल्लेख केला. परदेशी छात्रांचे कौतुक करताना नौदलप्रमुख म्हणाले की यामुळे भारताचे इतर देशांसोबतचे सहकार्य मजबूत होते तसेच भारतीय नौदल अकादमीत जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा असल्याचे यातून दिसून येते. दीक्षांत संचलनात सहभागी झालेल्या छात्रांना ते म्हणाले, “धैर्य, लवचिकता व समावेशक वृत्ती हे गुण लष्करात नेतृत्वासाठी आवश्यक आधारस्तंभ आहेत. लष्करातील अधिकाऱ्याचे खरे सामर्थ्य वेळेची गरज ओळखून त्यावर निर्णायक कृती करणे, प्रत्येक मोहीमेदरम्यान यश मिळविण्यासाठी आपल्या तुकडीला प्रोत्साहित करणे आणि कुठल्याही आव्हानाचा सामना यशस्वीपणे करणे यामध्ये आहे.”
***
N.Chitale/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2079422)
Visitor Counter : 54