लोकसभा सचिवालय
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये अर्थपूर्ण आणि विधायक संवादाची सर्वोच्च परंपरा खासदारांनी अंगीकारली पाहिजे : लोकसभा अध्यक्ष
"कर्तव्य काळा" मधील सामूहिक प्रयत्न आणि उत्कृष्ट संकल्पांच्या सहाय्याने 'विकसित भारत' च्या ध्येयाकडे भारताची आगेकूच : लोकसभा अध्यक्ष
Posted On:
26 NOV 2024 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2024
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये अर्थपूर्ण आणि विधायक संवादाची उत्कृष्ट परंपरा सदस्यांनी अंगीकारली पाहिजे, असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सांगितले. संविधान सभेच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून ते म्हणाले की, संविधान सभेचे सदस्य वेगवेगळ्या विचारसरणीचे होते, परंतु प्रत्येक अनुच्छेदावर विचारमंथन करत, पूर्ण सन्मानाने आणि आदराने सहमती किंवा असहमती व्यक्त करत.
संविधान सदनात आयोजित 10 व्या संविधान दिवसानिमित्त स्वागतपर भाषण करताना बिर्ला यांनी सर्व संसद सदस्यांना विधिमंडळात अर्थपूर्ण आणि आदरपूर्ण संवादाच्या या सर्वोच्च परंपरा अंगीकारण्याचे आवाहन केले.
1949 मध्ये संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्य उपस्थित होते.
यावर्षीच्या संविधान दिवसाची संकल्पना "हमारा संविधान, हमारा स्वाभिमान" अशी आहे.
बिर्ला यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या निर्मितीतील योगदानाचे स्मरण केले आणि ते म्हणाले की यामुळे आपल्या समाजाबद्दल संविधान सभा सदस्यांचे विचार समजून घेण्यास मदत होते.
ते म्हणाले की, संविधान ही देशातील सामाजिक आणि आर्थिक बदलांमागील प्रेरक शक्ती आहे आणि देश सामूहिक प्रयत्नातून आणि "कर्तव्य काल" मधील महान संकल्पाने 'विकसित भारता'च्या ध्येयाकडे आगेकूच करीत आहे.
संविधान हे केवळ कायदेशीर मार्गदर्शक नसून एक सर्वसमावेशक सामाजिक दस्तऐवज आहे, असे अधोरेखित करून बिर्ला यांनी नमूद केले की संविधानाने लोकशाहीचे तीन स्तंभ - विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचा परस्पर समन्वय साधून सुरळीत कामकाज सुनिश्चित केले आहे. ते पुढे म्हणाले की या 75 वर्षांमध्ये तिन्ही शाखांनी देशाची सेवा उत्कृष्टपणे केली आहे.
भारताच्या जागतिक भूमिकेबद्दल आणि प्रभावाबद्दल बोलताना बिर्ला यांनी नमूद केले की संविधान आपल्या नागरिकांना "वसुधैव कुटुंबकम" - जग एक कुटुंब आहे या तत्त्वाचे पालन करण्यास प्रेरित करते.
भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त एक नाणे आणि तिकिट जारी करण्यात आले. “मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया: अ ग्लिम्प्स” आणि “मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड इट्स ग्लोरियस जर्नी” या दोन पुस्तकांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशनांव्यतिरिक्त, भारतीय राज्यघटनेची कला या विषयावरील पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. संस्कृत आणि मैथिली भाषेतील भारतीय राज्यघटनेच्या दोन नवीन आवृत्त्याही प्रसिद्ध करण्यात आल्या.
भारतीय राज्यघटनेचे वैभव, त्याची निर्मिती आणि ऐतिहासिक प्रवास याला समर्पित असलेले लघुपट सादरीकरण मान्यवरांसाठी करण्यात आले.
N.Chitale/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2077742)
Visitor Counter : 9