माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 7

साहसाची एक प्रेरणादायी कहाणीः 'अमेरिकन वॉरियर’ ने 55व्या इफ्फीमध्ये दाखवली चमक


“एका चित्रपटापेक्षाही ती अधिक काही आहे- माझ्या सहनशीलतेची ती कहाणी आहे”- अभिनेता विशी अय्यर

जीवनातील प्रेमाचे आणि दुसऱ्या संधीचे सामर्थ्य दाखवतो ‘अमेरिकन वॉरियर’- अभिनेत्री टेलर ट्रेडवेल

‘अमेरिकन वॉरियर’ घेतो स्थलांतरितांच्या अनुभवाचा; भारतीय अमेरिकन्सचा संघर्ष आणि आकांक्षांचा वेध- निर्मात्य रिशाना

#IFFIWood, 25 नोव्‍हेंबर 2024

 

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने जागतिक सिने समुदायाचे खुल्या दिलाने स्वागत केले, ज्यामध्ये बहुप्रतिक्षित अमेरिकन वॉरियर प्रकाशाच्या झोतात राहिला. गुस्तावो मार्टिन दिग्दर्शित, अमेरिकेतील या प्रेरणादायी चित्रपटात एका भारतीय अमेरिकी स्थलांतरितांचा परिवर्तनकारी प्रवास दाखवण्यात आला आहे. जय नावाच्या माजी हौशी एमएमए फायटर आणि पूर्वाश्रमीच्या गुन्हेगाराची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटात पाहायला मिळते. एका दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडल्यावर तो प्रायश्चित्ताच्या मार्गावर चालू लागतो. त्याच्या साहसामुळे नकळत तो एक नायक बनतो, ज्यामुळे लोकांच्या नजरेत येतो आणि नव्या आव्हानांना सामोरा जाऊ लागतो. या चित्रपटाने केवळ चाकोरीबद्धपणाच्या चौकटीलाच आव्हान दिलेले नाही तर प्रेक्षक आणि समुदायाच्या हृदयाला भिडणारा एक संदेश देखील दिला आहे. विशी अय्यर या प्रमुख अभिनेत्याचा करिष्मा आणि निर्धार यांना देखील हा चित्रपट अधोरेखित करतो, ज्याने या भूमिकेत एक सच्चेपणा आणला आहे आणि भूमिकेला खोली प्राप्त करून दिली आहे.  

या चित्रपटाच्या वार्ताहर परिषदेत या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेले अभिनेते विशी अय्यर, अभिनेत्री टेलर ट्रेडवेल आणि निर्माते क्रिस्टी कूर्स बिस्ली आणि रशाना यांच्यासह चित्रपटाशी संबंधित असलेल्या प्रतिनिधींची ओळख करून देण्यात आली. हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या प्रतिनिधींनी या कथानकाचा उगम आणि त्याचा प्रभाव याविषयी आपापला दृष्टीकोण मांडला. यावेळी या चित्रपटाचा एक आकर्षक ट्रेलर दाखवण्यात आला, ज्यामुळे प्रेक्षकांना या कथेचा सच्चेपणा जाणवून देणारे, भावनात्मक गहनतेमध्ये घेऊन जाणारे एक रोमांचक वातावरण तयार केले.

या प्रवासाविषयी बोलताना विशी अय्यर यांनी या चित्रपटामागील त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांमध्ये खोलवर रुजलेल्या अतिशय सखोल वैयक्तिक प्रेरणेचा खुलासा केला.  आर्थिक संकटाच्या काळात कोट्यवधी डॉलरचा व्यवसाय गमावल्यावर आणि बहिष्काराला तोंड दिल्यावर अय्यर यांनी आध्यात्मिकता आणि आत्मशोधाचा मार्ग पत्करला.  भग्वदगीतेतील शिकवणीपासून, विशेषतः अर्जुनाच्या कथेपासून धडा घेत त्यांनी दृढसंकल्प आणि मुक्तीची संकल्पना तयार केली.

मेलिसा या एकट्या मातेची भूमिका साकारणाऱ्या टेलर ट्रेडवेल यांनी आपली भूमिका अतिशय खोलवर अर्थ सांगणारी होती असे सांगितले. “अमेरिकन वॉरियर प्रेम आणि दुसऱ्यांदा मिळणाऱ्या संधीचे सामर्थ्य प्रदर्शित करतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या चित्रपटातील ऍक्शन आणि भावनात्मक खोली यामधील संतुलन त्यांनी अधोरेखित केले. हा चित्रपट केवळ शारीरिक लढायांविषयीच नाही तर मानवी दृढतेची व्याख्या करणार्या अंतर्गत संघर्षाविषयी देखील असल्याचे त्यांनी नमूद केले.

चित्रपटाचा सच्चेपणा त्याच्या यथार्थवादाविषयीच्या बांधिलकीमुळे आणखी जास्त वाढतो, याकडे टेलर ट्रेडवेल यांनी लक्ष वेधले. या चित्रपटातील हाणामारीच्या दृश्यांमध्ये वास्तविकता आणण्यासाठी अय्यर यांनी एका यूएफसी फायटरच्या हाताखाली कठोर प्रशिक्षण घेतले. विशी अय्यर यांनी भावनात्मक आणि शारीरिक या दोन्ही प्रकारच्या आव्हानांना निर्धाराने तोंड दिले, ज्यामुळे चित्रपटाच्या दृढसंकल्पाच्या संदेशाला जास्त वजन प्राप्त झाले.  

भारतीय-अमेरिकन लोकांचा संघर्ष आणि आकांक्षा यावर प्रकाश टाकत निर्मात्या राशाना यांनी स्थलांतरितांच्या अनुभवावर या चित्रपटाचा भर दिला. लवचिकता आणि आशा या सार्वत्रिक संकल्पनांना अधोरेखित करत त्यांनी अमेरिकन आणि भारतीय प्रेक्षकांना या चित्रपटातून केलेल्या आवाहनाकडे लक्ष वेधले. आणखी एक निर्माते, क्रिस्टी कूर्स बीसले यांनी, अधिक प्रामाणिक कथा सादर करण्यासाठी ग्लॅमरच्या पलीकडे जाऊन, अमेरिकन जीवनातील गंभीर बाजू प्रदर्शित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

निर्मात्यांच्या चमूने महिला पात्रांना प्रकाशझोतात आणून नेहमीच्या चाकोरीतील कथनाला बदलण्याविषयी अभिमान व्यक्त केला. एका महिलेला फाईट डॉक्टर दाखवण्यापासून ते संतुलित लैंगिक सादरीकरणापर्यंत या चित्रपटाने उद्योगाच्या मानकांना आव्हान दिले आहे आणि महिला पात्रांच्या नव्या शक्यतांकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची प्रेरणा दिली आहे.

या चित्रपटाला अनेक महोत्सवांमध्ये अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रेक्षक या चित्रपटाच्या विषयामध्ये खोलवर सामावून गेले. या पत्रकार परिषदेदरम्यान, या चमूने स्क्रीनिंगच्या वेळी अनेक प्रेक्षकांकडून त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांसोबत या चित्रपटाची तुलना करून दिलेल्या भावनोत्कट प्रतिसादांची माहिती सामाईक केली.

अनुभवी साहसी दृश्य समन्वयक आणि एमएमए प्रोफेशनल फायटर्स यांच्या योगदानासह या चित्रपटाच्या चमूचे सर्जनशील सहकार्य या चित्रपटाच्या यशातील महत्त्वाचा घटक ठरल्याचे अधोरेखित करण्यात आले. परिवर्तन, साहस आणि सांस्कृतिक सेतू बांधणीचा समावेश असलेले एक प्रभावी कथानक म्हणून अमेरिकन वॉरियर उदयाला आला आहे. चित्रपटाची संकल्पना सर्व सीमा ओलांडून आशा आणि दृढतेच्या सार्वत्रिक संदेशासोबत अतिशय गहनतेने जोडले जाण्याची संधी प्रेक्षकांना प्रदान करत  आहे.

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Shailesh/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2077585) Visitor Counter : 5