वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन
Posted On:
20 NOV 2024 1:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2024
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी -20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टारमर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर पुढील वर्षी भारत-ब्रिटन मुक्त व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या ब्रिटनच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो.
संतुलित, परस्पर हिताच्या आणि पुरोगामी मुक्त व्यापार कराराचे महत्त्व लक्षात घेऊन, परस्पर सामंजस्याने उर्वरित समस्या सोडवण्यासाठी ब्रिटनच्या वाटाघाटी संदर्भात चर्चा करणाऱ्या चमूसोबत काम करण्यास भारत उत्सुक आहे. 2025 च्या पूर्वार्धात मुक्त व्यापार चर्चेच्या तारखा राजनैतिक माध्यमांद्वारे लवकरात लवकर निश्चित केल्या जातील. मुक्त व्यापार कराराची चर्चा पुर्वी साध्य केलेल्या प्रगतीपासून पुढे सुरू केली जाईल आणि व्यापार करार जलदगतीने अंमलात आणण्यासाठी यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
भारताचे ब्रिटन सोबतचे व्यापार संबंध सातत्याने वाढत असून दृढ सहकार्य आणि धोरणात्मक सहभागाची अफाट क्षमता त्यातून दिसून येते. एप्रिल ते सप्टेंबर 2024 पर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताकडून ब्रिटनला केल्या जाणाऱ्या निर्यातीत 2023 मधील याच कालावधीतील 6.51 अब्ज डॉलरच्या तुलनेत, 12.38% ची मजबूत वाढ होऊन ती 7.32 अब्जपर्यंत पोहोचली आहे. खनिज, इंधन, यंत्रसामग्री आणि मौल्यवान खडे, औषधे, तयार कपडे, लोह आणि पोलाद आणि रसायने निर्यातीमध्ये आघाडीवर असून एकूण निर्यातीत त्यांचा वाटा 68.72% इतका आहे. आर्थिक वर्ष 2030 पर्यंत आमचे महत्त्वाकांक्षी 1 ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ब्रिटन हा आमचा प्राधान्य असलेला देश असून 2029-30 पर्यंत ब्रिटनला केली जाणारी आमची निर्यात 30 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचेल असा अंदाज आहे.
* * *
G.Chippalkatti/S.Kane/Darshana
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2074955)
Visitor Counter : 14