गृह मंत्रालय
गुजरातमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करून 700 किलोहून अधिक वजनाचे मेथॅम्फेटामाईन हे प्रतिबंधित अंमली द्रव्य जप्त केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणांचे केले अभिनंदन
Posted On:
15 NOV 2024 6:05PM by PIB Mumbai
गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून 700 किलोहून अधिक वजनाचे मेथॅम्फेटामाईन हे प्रतिबंधित अंमली द्रव्य जप्त केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणांचे अभिनंदन केले आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी), भारतीय नौदल आणि गुजरात पोलीस यांनी केलेली ही संयुक्त कारवाई म्हणजे आपली यासंदर्भातील वचनबद्धता तसेच कारवाई यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्व यंत्रणांमध्ये असलेला सुरळीत समन्वय यांचे भक्कम उदाहरण आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व यंत्रणांचे माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन.
अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी), भारतीय नौदल आणि गुजरात पोलीसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे कारवाई करत, भारताच्या जल हद्दीत सुमारे 700 किलो मेथचा साठा असलेले जहाज रोखले. कोणत्याही ओळखपत्राशिवाय जहाजावर असलेले 08 परदेशी नागरिक इराणी असल्याचे समजते.
सातत्यपूर्ण गुप्त माहिती संकलन आणि विश्लेषण याद्वारे अशी खात्रीलायक माहिती मिळाली की कोणतेही स्वयंचलित ओळख यंत्रणा (एआयएस) न बसवलेले, नोंदणी नसलेले जहाज अंमली पदार्थांसह भारताच्या जल हद्दीत प्रवेश करणार आहे. या गुप्त माहितीच्या आधारे “सागर-मंथन-4” ही मोहीम आखण्यात आली, तसेच पुढील हालचाली करत विवक्षित जहाजाची ओळख पटवून, भारतीय नौदलाने त्यांच्या मोहिमेसाठी नेमलेल्या सागरी टेहळणी यंत्रणांना सतर्क करत हे जहाज रोखले. 15 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान उपरोल्लेखित अंमली पदार्थ जप्त करून 08 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.
जप्त केलेल्या अंमली पदार्थाच्या साठ्याचे भारतात पोहोचण्यापूर्वीचे तसेच भविष्यातील लागेबांधे जाणून घेण्यासाठी तपास सुरु असून त्यासाठी परदेशातील अंमली पदार्थसंबंधी कायदा अंमलबजावणी प्राधिकरणाची मदत घेण्यात येत आहे. ही कारवाई म्हणजे देशातील विविध संस्थांच्या दरम्यान सहकार्य आणि समन्वयाचे देखील उत्तम उदाहरण आहे.
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2073755)
Visitor Counter : 27