पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 13 नोव्हेंबरला बिहार भेटीवर


पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधील 12,100 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी तसेच लोकार्पण होणार

या भागातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना मोठी चालना देत पंतप्रधान दरभंगा येथील एम्सची करणार पायाभरणी

विशेष लक्ष केंद्रित केले जाणारे प्रकल्प : रस्ते आणि रेल्वे जोडणी

वाहिनीद्वारे गॅस पुरवठ्याच्या माध्यमातून स्वच्छ उर्जा, पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी विविध प्रकल्पांचा पंतप्रधानांच्या हस्ते कोनशीला समारंभ

एका अनोख्या उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान देशभरातील काही रेल्वे स्थानकांवरील 18 जनौषधी केंद्रांचे करणार लोकार्पण

Posted On: 12 NOV 2024 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2024


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 13 नोव्हेंबर रोजी बिहारला भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा प्रारंभ  दरभंगा येथून होणार आहे.सकाळी पावणेअकराच्या सुमारास, बिहारमधील 12,100 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी तसेच लोकार्पण कार्यक्रम होईल. त्या भागातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना मोठी चालना देत पंतप्रधान नरेंद्र मोदी दरभंगा येथे 1260 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह उभारण्यात येणाऱ्या एम्स संस्थेची  ठेवणार आहेत.  या ठिकाणी वैद्यकीय तज्‍ज्ञांची   सुविधा असलेले  सुसज्ज रुग्णालय/आयुष ब्लॉक, वैद्यकीय महाविदयालय, परिचारिका महाविद्यालय, रात्र निवारा तसेच निवासाच्या सुविधांसह इतर अनेक सोयी केल्या जाणार आहेत. बिहार आणि आसपासच्या प्रदेशातील लोकांना या एम्स मध्ये तृतीय स्तरावरील वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील.

रस्ते आणि रेल्वे अशा दोन्ही क्षेत्रांतील नव्या प्रकल्पांच्या उभारणीद्वारे या भागात जोडणी क्षमतेला चालना देणाऱ्या प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येईल. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी बिहारमधील 5,070 कोटी रुपये खर्चाच्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा कोनशीला समारंभ होईल.

पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग क्र.327 ई मधील गल्गलीया-अरारिया या चौपदरी टप्प्याचे उद्घाटन करतील.ही मार्गिका अरारिया पासून पूर्व-पश्चिम मार्गिकेवर (राष्ट्रीय महामार्ग क्र.-27) गल्गलीया येथे पश्चिम बंगाल या शेजारी राज्यात जाण्यासाठीचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देईल. यानंतर पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग क्र.-110 वर जेहानाबादला बिहारशरीफशी जोडणाऱ्या  बंधुगंज येथील मुख्य पुलाचे उद्घाटन करतील.

पंतप्रधानांच्या हस्ते आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये रामनगर ते रोसेरा या दोहोबाजूंना पदपथ असलेल्या दुपदरी रस्त्याच्या बांधकामासह, बिहार-पश्चिम बंगाल सीमेपासून एनएच -131A च्या मनिहारी विभागापर्यंतच्या खंडाचा, महनर आणि मोहिउद्दीन नगरमार्गे हाजीपूर ते बछवारा, सरवान.-चकाई विभाग  यासह इतर रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे. एनएच -327E वरील राणीगंज बायपास मार्ग;  एनएच -333A वरील कटोरिया, लाखपुरा, बांका आणि पंजवाडा बायपास मार्गांची; आणि एनएच -82 ते एनएच -33 पर्यंतच्या चार पदरी ‘लिंक’ रस्त्याचीही ते पायाभरणी करतील.

पंतप्रधान 1740 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांचेही लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील चिरालापोथू ते बाघा बिश्नूपूर या 220 कोटी रुपयांच्या सोनेनगर बायपास रेल मार्गांचीही त्यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात येणार आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी  1520 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे देखील लोकार्पण करतील. यामध्ये झांझरपूर-लौकाहा बाजार रेल मार्गाच्या खंडाचे  गेज  रूपांतरण, दरभंगा बायपास रेल मार्गांच्या कामाचा समावेश आहे, यामुळे दरभंगा जंक्शनवर होणारी कोंडी दूर होऊन तेथील वाहतूक सुरळित होऊ शकेल, याशिवाय  रेल्वे मार्ग प्रकल्पांची संख्या  दुप्पट करून प्रादेशिक दळणवळण सुलभ करणाऱ्या अन्य प्रकल्पांचा समावेश आहे.

झांझरपूर-लौकाहा बाजार सेक्शनमधील रेल्वे सेवांनाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. या विभागामध्ये एमईएमयू- मेमू रेलगाडी  सेवा सुरू केल्याने आसपासच्या गावांमध्ये आणि शहरांना रोजगाराच्या संधी, शिक्षण आणि आरोग्य सुविधा सहजपणे उपलब्ध होऊ शकतील.

पंतप्रधानांच्या हस्ते भारतभरातील विविध रेल्वे स्थानकांवरील 18 प्रधान मंत्री भारतीय जन औषधी केंद्रांचेही लोकार्पण करण्यात येईल. या केंद्रांमुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर स्वस्त दरात औषधे उपलब्ध होतील. तसेच प्रवाशांमध्ये जेनेरिक औषधांबदल जागरूकता आणि त्यांचा स्वीकार होण्यास प्रोत्साहन मिळून आरोग्य सेवेवर होणारा त्यांचा एकंदर खर्च कमी होईल.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील 4,020 कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचीही पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी करण्यात येणार आहे. वाहिनीव्‍दारे  स्‍वयंपाकाचा गॅस  (पीएनजी) घराघरात पोहोचवण्याच्या तसेच  व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांना स्वच्छ ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे दरभंगा, मधुबनी, सुपौल, सीतामढी आणि शेओहर या बिहारच्या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरणाचे (सीजीडी) जाळे विकसित करण्याच्या कामाची पंतप्रधान पायाभरणी करतील. त्यांच्या हस्ते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बरौनी तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या बिटुमेन उत्पादन युनिटचीही पायाभरणी होणार आहे. या युनिटमध्ये स्थानिक पातळीवर बिटुमेनचे उत्पादन केले जाणार असल्याने आयात बिटुमेनवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.

S.Bedekar/S.Chitnis/M.Ganoo/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2072901) Visitor Counter : 51