संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतात ‘अनुकुलात्मक संरक्षण’ पद्धत निर्माण करणार: ‘दिल्ली डिफेन्स डायलॉग’ कार्यक्रमात संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन

Posted On: 12 NOV 2024 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2024

आजच्या काळात वेगाने बदलत असणाऱ्या जगामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘ॲडाप्टिव्ह डिफेन्स’ म्हणजेच ‘अनुकुलनात्मक संरक्षण’ पद्धत निर्माण करण्याचा दृढ  निर्धार सरकारने केला आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. नवी दिल्ली येथील मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेने (एमपी-आयडीएसए) आज, 12 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या ‘अनुकुलनात्मक संरक्षण:आधुनिक युद्धस्थितीच्या बदलत्या परिदृश्यातून प्रवास करताना’ या संकल्पनेवर आधारित ‘दिल्ली डिफेन्स डायलॉग’ म्हणजेच दिल्ली संरक्षण संवाद या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात संरक्षणमंत्री बोलत होते.

‘ॲडाप्टिव्ह डिफेन्स’ हा केवळ धोरणात्मक निवडीचा पर्याय नाही, तर एक गरज आहे असे ते म्हणाले."जसजसे आपल्या देशासमोर अनेक प्रकारचे धोके नव्याने उभे राहत आहेत त्याच पद्धतीने आपल्या संरक्षण यंत्रणा आणि धोरणे देखील विकसित झाली पाहिजेत.भविष्यात सामोऱ्या येणाऱ्या सर्व प्रकारच्या आपत्तींचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. केवळ देशाच्या सीमांचेच संरक्षण इतकाच हा विषय मर्यादित नाही तर आपले भविष्य सुरक्षित करण्याचा मुद्दा आहे,” संरक्षणमंत्री म्हणाले.

सध्याच्या डिजिटलीकरण आणि माहितीच्या अति प्रमाणात होत असलेल्‍या  माऱ्याच्या युगात, संपूर्ण जग अभूतपूर्व प्रमाणात मानसिक लढ्याला तोंड देत आहे यावर संरक्षणमंत्र्यांनी अधिक भर दिला. ते म्हणाले की,राष्ट्रीय सुरक्षेविरुद्ध होणाऱ्या माहितीविषयक युद्धाच्या धोक्याशी लढण्यासाठी ‘ॲडाप्टिव्ह डिफेन्स’ धोरणे अंमलात आणण्याचा सरकारचा निर्धार आहे.

संरक्षण आणि सुरक्षेशी संबंधित समकालीन समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सहकारात्मक दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. अशा बाबींमध्ये सहभागी असलेले कर्ते-करविते फक्त राष्ट्रेच नाहीत,तर इतर  घटक देखील आहेत यावर त्यांनी अधिक भर दिला. “सध्याची भूराजकीय परिस्थिती आणि सीमेपलीकडील समस्यांमुळे संरक्षणासाठी सहकारात्मक दृष्टीकोन गरजेचा झाला आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सायबर विश्वातील धूसरता तसेच क्वांटम आणि नॅनोतंत्रज्ञानामध्ये असलेली अफाट क्षमता,यामुळे शक्य असल्यास ज्ञान, दृष्टीकोन, माहिती आणि धोरणांच्या बाबतीत  सहयोग तसेच सामायीकीकरणाची अधिक आवश्यकता आहे,” ते म्हणाले.

एमपी-आयडीएसए संस्थेचे महासंचालक राजदूत सुजन आर.चिनॉय, हवाई दलाचे उप-प्रमुख एअर मार्शल एस पी धारकर, इतर नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांसह देश-परदेशातील सन्माननीय व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

 

S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2072729) Visitor Counter : 38