संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नाविका सागर परिक्रमा II करणारे आयएनएसव्ही तारिणी ऑस्ट्रेलियातील फ्रेमेंटल येथे दाखल

Posted On: 10 NOV 2024 5:38PM by PIB Mumbai

 

नाविका सागर परिक्रमा II नावाची जागतिक परिक्रमा मोहीम हाती घेणारे तारिणी हे  भारतीय नौदलाचे जहाज, 39 दिवसांच्या आव्हानात्मक सागरी प्रवासानंतर, 9 नोव्हेंबर 24 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सुमारे 14: 30h वाजता (स्थानिक वेळेनुसार 17:00 वाजता) ऑस्ट्रेलियातील फ्रेमंटल या बंदरात दाखल झाले.  परिक्रमेवर निघालेल्या या जहाजाचा हा पहिलाच थांबा होता.

या ऐतिहासिक मोहिमेला 2 ऑक्टोबर 24 रोजी गोव्यातून नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते. https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2061255

या जहाजाने गोव्यातून निघाल्यापासून 4900 सागरी  मैल अंतर कापले आहे. या जहाजाने 16 ऑक्टोबर 24 रोजी विषुववृत्त तर 27 ऑक्टोबर 24 रोजी मकर वृत्त ओलांडले आहे. या 38 दिवसांच्या अखंडित प्रवासादरम्यान, लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा या भारतीय नौदलातील जोडीने  वाऱ्याला तोंड देत, शांत ते प्रतिकूल  अशा विविध हवामानाचा सामना केला, या प्रवासात त्यांना 40 नॉट्स वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला तसेच 4 ते  6 मित्र उंचीच्या लाटांना  तोंड द्यावे लागले. संपूर्ण प्रवासात, संपूर्ण कर्मचारी दलाचे  आरोग्य उत्तम होते आणि आपल्या संकल्पाप्रती दृढ राहिले. खडतर परिस्थितीला तोंड देताना या दलाने असीम धैर्याचे प्रदर्शन केले.

नौदल  प्रमुखांनी या मोहिमेच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण केले असून  त्यांना  दररोज या मोहिमेची अद्यतनित माहिती दिली जात होती.  दिवाळीच्या पूर्वसंध्येला, हे जहाज सागरी प्रवासात असताना, नौसेना प्रमुखांनी यावरील दलाशी संवाद साधला होता. त्यावेळीही हे संपूर्ण दल त्यांच्या ध्येयासाठी पूर्णपणे प्रेरित आणि समर्पित असल्याचे दिसून आले.

आयएनएसव्ही तारिणीचे फ्रेमंटल बंदरात आगमन झाल्यावर पर्थ येथील भारताचे वाणिज्य दूतावास अधिकारी,कॅनबेराचे संरक्षण सल्लागार, इंडियन नेव्ही सेलिंग असोसिएशन चे सचिव, रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीचे प्रतिनिधी यांच्यासह इतर  मान्यवरांच्या हस्ते या नौकेचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तसेच ऑस्ट्रेलियात राहणारे भारतीय नौदलाचे निवृत्त कर्मचारी देखील उपस्थित होते. तामिळ असोसिएशन ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने पराई ड्रम आणि कोंबू थाराई ही तालवाद्ये वापरून सादर केलेल्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाने या स्वागत समारंभाला आणखी रंगत आणली तसेच स्वागत समारंभाला एक समृद्ध सांस्कृतिक स्पर्शही लाभला.

ही मोहीम आंतरराष्ट्रीय सागरी समुदायांसोबत मजबूत संबंध वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला देखील अधोरेखित करते आणि भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे राजदूत म्हणूनही काम करते.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2072199) Visitor Counter : 44


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil