संरक्षण मंत्रालय
भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्राहिंदला महाराष्ट्रात सुरुवात
Posted On:
08 NOV 2024 4:09PM by PIB Mumbai
ऑस्ट्राहिंद या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या संयुक्त लष्करी सरावाला पुण्यामध्ये फॉरिन ट्रेनिंग नोड येथे आज सुरुवात झाली. 8 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2024 दरम्यान हा सराव होणार आहे. ऑस्ट्राहिंद हा वार्षिक युद्धसराव असून तो भारत आणि ऑस्ट्रेलियात आलटून पालटून आयोजित केला जातो. यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये हा युद्धसराव ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आला होता.
भारतीय तुकडीमध्ये 140 लष्करी कर्मचारी असून त्यामध्ये प्रामुख्याने डोग्रा रेजिमेंटच्या जवानांचा आणि भारतीय हवाई दलाच्या 14 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन लष्करी तुकडीमध्ये 120 कर्मचारी असून त्यामध्ये सेंकड डिव्हीजनच्या 10 ब्रिगेडच्या 13व्या लाईट हॉर्स रेजिमेंटचा समावेश आहे.
ऑस्ट्राहिंद हा युद्धसराव संयुक्त राष्ट्रांच्या आदेशाच्या सातव्या अध्यायात नमूद केल्यानुसार अर्धशहरी आणि अर्ध-वाळवंटी प्रदेशात संयुक्त पारंपरिक मोहिमांमध्ये आंतरपरिचालनक्षमतेत वाढ करून या माध्यमातून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लष्करी सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित केला जातो.
हा युद्धसराव युद्ध तयारी आणि सामरिक प्रशिक्षण टप्पा आणि सत्यापन टप्पा अशा दोन टप्प्यात आयोजित केला जाईल. या युद्धसरावात आयोजित होणाऱ्या ड्रिल्स/ ऍस्पेक्ट्समध्ये दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या एखाद्या प्रदेशाच्या मुक्ततेची मोहीम, संयुक्त परिचालन केंद्राची स्थापना, छापे आणि शोध आणि उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमांसारख्या संयुक्त दहशतवादविरोधी मोहिमांचे आयोजन, हेलिपॅडचे संरक्षण, ड्रोन्सचा वापर आणि ड्रोन प्रतिबंधक उपाययोजना आणि विशेष हेलिबोर्न कारवायांचा समावेश आहे.
ऑस्ट्राहिंद हा युद्धसराव दोन्ही बाजूंना युद्धाच्या डावपेचांमधील सर्वोत्तम पद्धती, डावपेचांची आखणी करुन राबवल्या जाणाऱ्या मोहिमांमध्ये तंत्रज्ञान आणि प्रक्रियांचा वापर यांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये यामुळे सौहार्द आणि परस्परांविषयी सन्मान निर्माण होईल.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2071827)
Visitor Counter : 58