पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात हत्तींच्या मृत्यूची केंद्र सरकारने सुरू केली चौकशी

Posted On: 02 NOV 2024 6:40PM by PIB Mumbai

 

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील दहा हत्तींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने (WCCB) एक पथक तयार केले आहे. हे पथक या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत आहे.

याशिवाय, मध्य प्रदेश राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यासाठी पाच सदस्यीय राज्यस्तरीय समिती देखील स्थापन केली आहे.  पाच सदस्यीय समितीचे अध्यक्षपद अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (एपीसीसीएफ) (वन्यजीव) यांच्याकडे आहे. या समितीच्या सदस्यांमध्ये नागरी समाज, शास्त्रज्ञ आणि पशुवैद्यक तज्ञ यांचा समावेश आहे. राज्य टायगर स्ट्राइक फोर्स (STSF) प्रमुखांकडूनही या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.  एसटीएसएफने जंगल आणि लगतच्या गावांचा शोध घेतला असून घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य वन्यजीव वॉर्डन, मध्य प्रदेशातील बांधवगडमध्ये तळ ठोकून आहेत. ते या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईचे निरीक्षण करत आहेत.  दुसरीकडे, अतिरिक्त वन महासंचालक (व्याघ्र आणि हत्ती प्रकल्प), राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, तसेच नागपूर येथील राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सहाय्यक वन महानिरीक्षक यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि संबंधित विविध मुद्द्यांवर तसेच हत्तींच्या मृत्यूच्या संभाव्य कारणांबाबत राज्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मध्य प्रदेश राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हत्तींचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा. हत्तींच्या मृत्यूचे अंतिम कारण केवळ सखोल चौकशी, तपशीलवार शवविच्छेदन अहवाल, हिस्टोपॅथॉलॉजिकल आणि टॉक्सिकॉलॉजिकल अहवालांचे परिणाम तसेच इतर पुष्टीकारक पुराव्यांद्वारे निश्चित केले जाईल.  याशिवाय, राज्य अधिकाऱ्यांकडून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बांधवगड अभयारण्य परिसरात आणि आजूबाजूच्या हत्तींच्या कळपांवरची देखरेख वाढवण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या गस्ती कर्मचाऱ्यांना 29.10.24 रोजी मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या पतौर आणि खियातुली भागातील सालखानिया बीट्समध्ये चार हत्तींचा मृत्यू झाल्याचे आढळले.  या परिसरात आणखी शोध घेतला असता आजूबाजूला आणखी सहा हत्ती आजारी किंवा बेशुद्धावस्थेत आढळून आले.  क्षेत्रीय कर्मचारी आणि स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आजारी हत्तींवर औषधोपचार सुरू केले. या कामात त्यांना स्कूल ऑफ वाइल्डलाइफ फॉरेन्सिक अँड हेल्थ (SWFH) च्या पशुवैद्यकांच्या पथकानेही मदत केली. तसेच एसडब्ल्युएफएच चे सेवानिवृत्त प्रमुख डॉ. ए.बी. श्रीवास्तव यांचीही मदत घेण्यात आली. यासोबतचडेहराडून येथील वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII) मधील पशुवैद्य आणि प्राध्यापकांचे मतही घेण्यात आले.

तथापि, 30.10.24 रोजी चार आजारी हत्तींचा मृत्यू झाला.  नंतर, सतत औषधे आणि उपचारानंतरही, उर्वरित दोन आजारी आणि बेशुद्ध हत्तींनी 31.10.24 रोजी आपले प्राण गमावले. या मृत दहा हत्तींपैकी एक नर आणि नऊ माद्या होत्या.  तर, या दहा मृत हत्तींपैकी सहा बालवयीन किंवा किशोरवयीन तर चार प्रौढ होते. जंगलाच्या परिसरात असलेल्या कोडो किंवा कोदरा भरड धान्याच्या पिकावर तेरा हत्तींच्या कळपाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

14 पशुवैद्य किंवा वन्यजीव पशुवैद्यकांच्या पथकाने दहा हत्तींचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर या हत्तींचा व्हिसेरा 01.11.24 रोजी बरेलीमधील इज्जतनगर येथील आयव्हीआरआय आणि सागर येथील एफएसएल येथे विषाशास्त्र (टॉक्सिकॉलॉजिकल) आणि ऊतीविकृतीशास्त्र (हिस्टोपॅथॉलॉजिकल) तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच, हत्तींचे रक्त आणि इतर नमुने 30.10.24 रोजी एसडब्ल्युएफएच कडे पाठवण्यात आले होते. तर, आजारी हत्तींवर उपचार करताना पाठवलेल्या नमुन्यांमध्ये विषारी द्रव्ये असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले आहे.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2070384) Visitor Counter : 51


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil