संरक्षण मंत्रालय
स्वावलंबन 3.0: स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी अदिती 3.0 आव्हान आणि डिस्क 13 चे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
29 OCT 2024 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2024
अदिती 3.0 अर्थात एसिंग डेवलपमेंट ऑफ इनोवेटिव्ह टेक्नॉलॉजीज् विथ आयडीईएक्सची तिसरी आवृत्ती आणि डिस्क 13 अर्थात डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंजेसची 13 व्या आवृत्तीचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली स्थित भारत मंडपम इथे 29 ऑक्टोबर 2024 रोजी नौवहन नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संघटना – एनआयआयओच्या परिसंवादात करण्यात आले. या उपक्रमांमागे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेला गती देण्याचा उद्देश आहे.
अदिती 3.0 मध्ये भारतीय नौदलाने उच्च क्षमतेची मायक्रोवेव्ह शस्त्र यंत्रणा बनवण्याचे आव्हान दिले आहे. डिस्क 13 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), लष्करी संवाद आणि स्वायत्त बॉट् आदींशी संबंधित सात वेगवेगळ्या आव्हानांचा समावेश असून तीन लष्कराची व नौदल आणि हवाई दलाच्या प्रत्येकी दोन आव्हानांचा समावेश आहे.
संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते आयडीईएक्स विजेते आणि हॅकेथॉन विजेत्यांनाही गौरवण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की स्वावलंबन प्रदर्शनाच्या पहिल्या दोन आवृत्त्यांमध्ये भारतीय नौदलाने मांडलेल्या स्प्रिंट आव्हानांतर्गत भारतीय उद्योगांकडून 2,000 पेक्षा जास्त प्रस्ताव आले. तसेच, स्वावलंबन उपक्रम आयडीईएक्स अंतर्गत 213 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सशी जोडला गेला आहे.
संरक्षण दलांनी समोर ठेवलेल्या आव्हानांना उत्तरादाखल नवोन्मेषी उपाययोजना मांडणाऱ्या विजेत्यांचे संरक्षण मंत्र्यांनी अभिनंदन केले व त्यांचे यश अद्भूत असल्याचे म्हटले. भविष्यवेधी विचार करून उत्पादने निर्माण करण्याचा उपदेश संरक्षण मंत्र्यांनी त्यांना यावेळी केला. ही उत्पादने तातडीने गरजेची नसली तरी विकसित झाल्यावर भविष्यात संरक्षण दलांना उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी नवोन्मेषाच्या वाढीचे श्रेय देशभरातील युवांच्या स्टार्टअप्सच्या वाढत्या संख्येला दिले. ही संख्या एक लाखांपेक्षा जास्त असून पैकी 100 तरी युनिकॉर्न्स असल्याचे त्यांनी नमूद केले. “संरक्षण उत्पादनात स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आपल्या युवावर्गाच्या लक्षात आले आहे की नवोन्मेषाद्वारे देशाला आत्मनिर्भर बनवता येऊ शकते.”
या प्रसंगी बोलताना, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी देशाचे सागरी क्षेत्रातील हितसंबंध जोपासण्याप्रती नौदलाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यासाठी 2047 पर्यंत संपूर्ण आत्मनिर्भर दल बनण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“गेल्या दोन आवृत्त्यांना लाभलेल्या प्रचंड यशाने यंदाच्या आवृत्तीची व्याप्ती आणि प्रमाण वाढवण्याची प्रेरणा दिली. त्यातून नवे तंत्रज्ञानाचे आव्हान आणि हॅकेथॉनला सुरुवात झाली. यंदाच्या आवृत्तीचे विशेष म्हणजे संरक्षण क्षेत्रातील सर्वाधिक लोक यात सहभागी झाले. त्यामध्ये लष्कर, हवाई दल, तट रक्षक तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, डीआरडीओ आणि संरक्षण पीएसयूंचा समावेश आहे,” असे नौदल प्रमुख म्हणाले.
आयडीईएक्स विजेते आणि नवोन्मेषी निर्मांत्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या भविष्यवेधी संकल्पना यावेळी संरक्षण मंत्र्यांनी पाहिल्या.
* * *
N.Chitale/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2069384)
आगंतुक पटल : 79