विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
मोदी 3.0 च्या "विज्ञानाला प्रोत्साहन" चा उद्देश विकसित भारत साकार करणे हा आहे - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
27 OCT 2024 3:13PM by PIB Mumbai
माध्यमांसोबतच्या चर्चेत, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सरकारची धाडसी आणि धोरणात्मक संकल्पना मांडली . मोदी 3.0 च्या "विज्ञानाला प्रोत्साहन " चा उद्देश विकसित भारत साकार करणे हा आहे, असे ते म्हणाले.
अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सना सहाय्य करण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल निधी सुरू करण्यापासून ते जैव अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने बायो E3 धोरण सादर करण्यापर्यंत, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील सुरुवातीच्या 100 दिवसांमधील प्रमुख उपक्रम जागतिक नवोन्मेषाबाबत भारताच्या भूमिकेला पुढे नेण्याप्रति वचनबद्धता दर्शवतात, असे सिंह म्हणाले.
डॉ. जितेंद्र सिंह यांच्या संवादातील प्रमुख ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे खास अंतराळ क्षेत्रासाठी 1,000 कोटी रुपयांच्या व्हेंचर कॅपिटल निधीची घोषणा. मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेला हा निधी, भारताच्या सुमारे 300 अंतराळ स्टार्टअप्सच्या वाढत्या संख्येचा लाभ उठवण्यासाठी एका व्यापक योजनेचा एक भाग आहे. हे क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत भारताने आपल्या अंतराळ परिसंस्थेत लक्षणीय बदल घडवून आणला आहे.
बायो E3 धोरणासह, "जैव-प्रणित " भविष्यासाठी एक दृष्टीकोन डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केला. पुढील औद्योगिक क्रांती पारंपारिक उत्पादनाऐवजी जैव अर्थव्यवस्थेच्या उपक्रमांमधून साकारली जाईल, असे ते म्हणाले. पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि रोजगारासाठी जैवतंत्रज्ञानाचा समावेश असलेले धोरण, आयातीवरील अवलंबित्व कमी करताना स्रोतांमध्ये स्वयंपूर्णता निर्माण करण्याच्या दृष्टीने तयार केले आहे. पेट्रोलियम-आधारित स्रोतांकडून जैवइंधन पर्यायांकडे वळणे, कचरा-ते-इंधन परिवर्तन आणि इतर शाश्वत पद्धती सक्षम करणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हवामानविषयक अंदाजांची अचूकता वाढवण्याच्या उद्देशाने मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या 100 दिवसांमध्ये सुरू केलेल्या मिशन मौसम उपक्रमाबाबत डॉ. जितेंद्र सिंह यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले की अंतराळ आणि आयटी तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करणारे हे मिशन,केवळ भारतासाठीच नाही तर बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेसह शेजारी देशांसाठी देखील वास्तविक वेळेत कृती करण्यायोग्य हवामान अंदाज प्रदान करण्याची अनुमती भारताला देते.
सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रमांचे मूळ आत्मनिर्भरता आणि जागतिक नेतृत्वाप्रति वचनबद्धतेमध्ये आहे, यावर मुलाखतीच्या शेवटी डॉ. जितेंद्र सिंह यांनी भर दिला. अंतराळ आणि जैवतंत्रज्ञानामध्ये धोरणात्मक गुंतवणूक करून, भारत केवळ आर्थिक विकासाला चालना देत नाही तर भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या शाश्वत उद्दिष्टांशी अनुरूप होत आहे. ही धोरणे, आर्थिक लवचिकता आणि जनतेचे कल्याण या दोन्हींवर प्रभाव पाडणाऱ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्याची देशाची महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करते, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
स्वयंपूर्ण, वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत भविष्याकडे भारताचा प्रवास हा प्रत्येक नवीन धोरण, निधी आणि भागीदारीबरोबर जोडला जात आहे याचा डॉ जितेंद्र सिंह यांनी पुनरुच्चार केला. "आमचे ध्येय विज्ञान भारतासाठी क्रियाशील बनवणे हे आहे- जे आपल्या आव्हानांवर उपाय शोधेल , आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देईल आणि आपल्या प्रत्येक नवोन्मेष आणि यशाचा लाभ थेट आपल्या नागरिकांना पोहचेल, हे सुनिश्चित करेल," असे ते म्हणाले.
***
M.Pange/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2068688)
Visitor Counter : 62