प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सल्लागार परिषदेच्या (पीएम-एसटीआयएसी) 26 व्या बैठकीत देशातील संशोधन आणि नवोन्मेषासाठी उद्योग-शेक्षणिक क्षेत्रातील भागीदारीला गती देण्यावर चर्चा
Posted On:
18 OCT 2024 8:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2024
पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सल्लागार परिषदेची (पीएम-एसटीआयएसी) 26 वी बैठक आज (18 ऑक्टोबर 2024) प्राध्यापक अजय कुमार सूद यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील विज्ञान भवन ॲनेक्स येथे झाली.
पीएम-एसटीआयएसी सदस्यांसह, या बैठकीत सरकारी अधिकारी, शैक्षणिक संस्था आणि उद्योग संस्थांमधील धुरीण विचारमंथनासाठी आणि सद्यस्थिती,व्यवहार्य भागीदारी मॉडेल्स, त्यांचे स्थानिक संदर्भ आणि प्रभावी अंमलबजावणी पद्धतींबद्दल सखोल माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी झाले होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात, प्रा. सूद यांनी सामान्य संशोधन आणि नवोन्मेष (आर अँड आय) यात आणि विशेषत: अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या (एएनआरएफ) माध्यमातून प्रगती करण्यासाठी उद्योग-शैक्षणिक क्षेत्रातील भागीदारी मजबूत करण्याच्या गरजेवर प्रकाश टाकला. या उद्दिष्टासाठी, उद्योग, शिक्षण क्षेत्रातील आणि सरकार मधील हितधारकांनी संशोधन आणि नवोन्मेष उपक्रमांसाठी देशात केलेल्या प्रयत्नांचा सामाजिक-आर्थिक लाभ वृद्धिंगत करण्याकरिता पूरक भूमिका बजावली पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
देशातील संशोधन आणि नवोन्मेषाला गती देण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र सहयोग करू शकणारी प्राधान्य क्षेत्रे ओळखण्याचे आवाहन नीती आयोगाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सदस्य डॉ.व्ही.के. सारस्वत यांनी केले.
संशोधन आणि नवोपक्रमासाठी सरकारी सुविधा असलेले उद्योग-शैक्षणिक भागीदारीचे तिहेरी हेलिक्स मॉडेल अधोरेखित करण्यासाठी तज्ज्ञांनी सादरीकरण केले. क्षेत्र-विशिष्ट मॉडेल, आव्हाने आणि आयसीटी, जीवन विज्ञान, औषधनिर्मिती, अंतराळ आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये अशा भागीदारी सक्षम करण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी शिफारशींवर या चर्चेचा मुख्य भर होता.
S.Kakade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2066232)
Visitor Counter : 52