पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
सरकारच्या सहयोगाने भारतातील जैव उर्जा परिसंस्थेच्या इंधन परिवर्तनाला प्रोत्साहन : पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी
Posted On:
14 OCT 2024 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2024
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) जैव उर्जा शिखर परिषदेच्या 12 व्या आवृत्तीत, “भविष्यासाठी इंधन - भारताचे हरित विकास लक्ष्य सुरक्षित करणे” या शिखर परिषदेच्या संकल्पनला संरेखित करून, जैव उर्जेमध्ये भारताची उल्लेखनीय प्रगती अधोरेखित केली. पुरी यांनी भारताच्या इथेनॉल संमिश्रण उपक्रमाच्या यशावर प्रकाश टाकला. या उपक्रमामुळे 2014 मध्ये 1.53% असलेली मिश्रणाची टक्केवारी 2024 पर्यंत वाढून 15% पर्यंत पोहोचली आहे. या परिणामामुळे प्रोत्साहित होऊन, सरकारने 2025 पर्यंत आपले मिश्रण उद्दिष्ट वाढवून 20% केले आहे. शाश्वत ऊर्जेसाठी वचनबद्धता. त्यांनी पुढे खुलासा केला की 20% मिश्रित लक्ष्य गाठल्यानंतर भविष्यासाठी रोडमॅप विकसित करण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. हा मार्गदर्शक आराखडा ऊर्जा शाश्वतता आणि स्वावलंबनाच्या दिशेने देशाच्या पुढील पावलांचा दिशादर्शक ठरेल.
हरदीप सिंह पुरी यांनी 2014 पासून भारताच्या जैव ऊर्जा परिसंस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि ऊर्जा क्षेत्रातील शाश्वतता वाढवण्यासाठी बाजारातील गतिशीलता, तंत्रज्ञानातील प्रगती आणि सहाय्यक सरकारी धोरणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर पुरी यांनी भर दिला.
पुरी यांनी इथेनॉल कार्यक्रमाचे प्रभावी परिणाम सामायिक केले. इथेनॉल मिश्रण उपक्रमामुळे 2014 ते ऑगस्ट 2024 या काळात 1,06,072 कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली तसेच कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन 544 लाख मेट्रिक टनांनी कमी झाले आणि 181 लाख मेट्रिक टन कच्च्या तेलासाठी पर्याय उपलब्ध झाला, हे त्यांनी स्पष्ट केले. तेल विपणन कंपन्यांकडून (OMCs) तेल शुद्धीकरण कारखान्यांना दिला जाणारा परतावा 1,50,097 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना अन्नदाता बनण्यापासून ते उर्जादाता होण्यासाठी सक्षम बनवून त्यांना 90,059 कोटी रुपये देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, शाश्वत विमान इंधन (SAF) साठी सरकारच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचा उल्लेख केला. यानुसार 2027 मध्ये 1% आणि 2028 मध्ये 2% इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट असून यामुळे जैव-गतिशीलतेमध्ये भारत अव्वलस्थानी असेल, असे ते म्हणाले.
हवामान उद्दिष्टे आणि ग्रामीण विकासामध्ये प्रगती करताना ही मागणी पूर्ण करण्यासाठी जैव उर्जा महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (IEA) च्या निव्वळ शून्य लक्ष्यांमुळे 2050 पर्यंत जैव इंधन मागणीत 3.5 ते 5 पट वाढीचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे भारतासाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी ठरेल, असे ते म्हणाले. भारतीय सौर आघाडी (ISA) आणि जागतिक जैव ऊर्जा आघाडी (GBA) सारख्या सरकारी उपक्रमांचे उद्दिष्ट स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांकडे संक्रमणाला गती देणे, आयात अवलंबित्व कमी करणे, परकीय चलन वाचवणे, चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि उर्जा आत्मनिर्भर भविष्याकडे वाटचाल करणे हे आहे.
इथेनॉल उत्पादनासाठी सरकारने सुरू केलेल्या विविध प्रोत्साहनांचाही उल्लेखही पुरी यांनी केला.
ऊर्जेच्या गरजा पूर्ण करणारे आणि जागतिक मानक स्थापित करणारे शाश्वत जैव ऊर्जा क्षेत्र विकसित करण्यासाठी सर्व भागधारकांनी सहकार्य करावे असे आवाहनही पुरी यांनी केले.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2064856)
Visitor Counter : 53