युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
देशाचे सांस्कृतिक राजदूत व्हा- केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
डी. वाय. पाटील विद्यापीठाद्वारे आयोजित 'विकसित भारत ॲम्बेसेडर-युवा कनेक्ट' कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्र्यांनी केले संबोधित
Posted On:
10 OCT 2024 5:34PM by PIB Mumbai
मुंबई, 10 ऑक्टोबर 2024
देशाचे सांस्कृतिक राजदूत व्हा, असे आवाहन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी युवा पिढीला केले आहे. ते आज नवी मुंबई येथे डी.वाय.पाटील विद्यापीठात आयोजित 'विकसित भारत ॲम्बेसेडर-युवा कनेक्ट' कार्यक्रमात बोलत होते. भारत हे अनेकानेक जागतिक पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हे लक्षात घेऊन युवा आणि विद्यार्थ्यांनी देशाची संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे वाहक आणि संरक्षक व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
देशातील युवा विकसित भारताचे निर्माते राहणार असून भविष्यात विकसित भारतात राहणारे लोक विकसित भारत घडवण्याचे श्रेय आजच्या युवा पिढीला देणार असल्याचे प्रतिपादन शेखावत यांनी यावेळी केले. वसाहतवादी राज्यकर्त्यांपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. वर्ष 2047 मध्ये विकसित भारत घडवण्यासाठी राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची हीच वेळ आणि संधी आहे, हीच आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली ठरेल, असे शेखावत यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत ‘रिफॉर्म(सुधारणा), परफॉर्म(कामगिरी), ट्रान्सफॉर्म(परिवर्तन)’ या धोरणाचा अवलंब करून असंख्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवल्याचे शेखावत यांनी सांगितले.
या धोरणामुळे बिगर बँकिंगला बँकिंग बनवून, आणि निधी नसणार्यांना निधी पुरवून, सार्वजनिक वितरण व्यवस्था, कौशल्य नसणाऱ्यांचा कौशल्य विकास, कृषी मालासाठी एक देश एक बाजारपेठ, आणि विमा नसणाऱ्यांना विमा कवच यासारख्या उपक्रमांसाठी पुढाकार घेतला गेला आणि जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशनाची सुरुवात झाली. गेल्या दहा वर्षांत देशाने पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास आणि परिवर्तनही पाहिले आहे. सरकारने डिजिटायझेशन आणि डिजिटल पेमेंटवरही भर दिला असून, तो इतर अनेक देशांसाठी देखील प्राधान्यक्रम ठरला आहे.
डिजिटल इंडियावर भर दिल्यामुळे कोविड-19 दरम्यान देशातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवता आली. असे नमूद करून केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले की, आज भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून, देशाला पुढे नेण्यात देशातील तरुणांचे मोठे योगदान आहे.
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री शेखावत म्हणाले की, स्वावलंबन अथवा ‘आत्मनिर्भरता’ हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. ते म्हणाले की, संरक्षण उत्पादन क्षेत्रासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये ‘आत्मनिर्भर भारत’चा प्रभाव दिसून येत आहे. तेजस विमानांना अनेक देशांकडून मागणी आहे, असेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले की, भारताची यशोगाथा ही विकासाची गती आणि प्रमाण, भ्रष्टाचाराबाबत शून्य सहिष्णुता आणि देशाच्या पारंपारिक मूल्यांमुळे घडली आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या कार्यक्रमात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि अध्यक्ष डॉ. विजय डी. पाटील, प्र-कुलगुरू आणि उपाध्यक्ष डॉ शिवानी व्ही. पाटील, कुलगुरू वंदना मिश्रा, NYKS संचालक (महाराष्ट्र आणि गोवा) प्रकाश कुमार मानुरे आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
PIB Mumbai | S.Kane/SonaliK/Rajshree/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2063885)
Visitor Counter : 75