कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईत अत्याधुनिक कौशल्य केंद्र उभारण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि बृहन्मुंबई महानगरपालिके दरम्यान सामंजस्य करार


नव्या उपक्रमांतर्गत कुशल प्रशिक्षणार्थींना 75 टक्के रोजगार सुनिश्चित करण्यासाठी सीआयआयची उद्योगातील अग्रणींसोबत भागीदारी

आगामी वर्षात विविध क्षेत्रांमध्ये एक लाख नोकरीच्या संधी निर्माण करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

500 लाभार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला मिळाले नोकरीचे प्रस्ताव

Posted On: 07 OCT 2024 9:59PM by PIB Mumbai

मुंबई, 7 ऑक्‍टोबर 2024

 

भारतीय उद्योग महासंघाने (CII) ने आयोजित केलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या उपक्रमात, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) ने कांदिवली, मुंबई येथे अत्याधुनिक कौशल्य केंद्र सुरू करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सोबत भागीदारी केली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत आज या संदर्भात औपचारिक सामंजस्य करार करण्यात आला. ज्यामुळे मुंबईच्या मनुष्यबळाला कुशल बनवण्याच्या प्रयत्नांना लक्षणीय चालना मिळणार आहे.

आपल्या भाषणात पीयूष गोयल यांनी या उपक्रमाचे महत्त्व  विशद केले. “हे कौशल्य विकास केंद्र अभिमानाने आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना समर्पित आहे, ज्यांची कुशल आणि आत्मनिर्भर भारताची दृष्टी आम्हाला सतत प्रेरणा देत आहे. शुभारंभ झाल्यापासून अवघ्या सहा दिवसांत या केंद्राने याआधीच 700 व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, त्याचा तात्काळ प्रभाव आणि त्यात असलेली क्षमता दाखवून दिली आहे. येत्या वर्षभरात विविध क्षेत्रातील १ लाख उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले. 

कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी पूर्ण करण्यामध्ये केंद्राची भूमिका केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केली. वेगाने विकसित होणाऱ्या रोजगाराच्या बाजारपेठेतील आव्हानांना तोंड देण्यासाठी युवा वर्गाला आवश्यक कौशल्ये सुसज्ज करेल. "उद्योगातील नेते आणि प्रशिक्षण कार्यक्रम यांच्यातील भागीदारी वाढवून, हे केंद्र शिक्षण आणि वास्तविक-जगातील रोजगार यांच्यातील तफावत कमी करत आहे.  तरुणांचे उत्थान करण्यासाठी आणि त्यांना आजच्या स्पर्धात्मक वातावरणात  प्रगतीशील होण्यामध्ये सक्षम बनवण्यासाठी ते आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, मंगल प्रभात लोढा यांनी, हे केंद्र इतक्या जलद गतीने पूर्ण झाल्याबद्दल प्रशंसा केली. “आम्ही ही सुविधा अवघ्या 44 दिवसांत स्थापन केली आहे, ही एक मोठी कामगिरी आहे जी मुंबई आणि आसपासच्या हजारो लोकांना संधी देईल. हे अत्याधुनिक केंद्र प्रभावी नेतृत्वाची ताकद दाखवून देशभरातील व्यक्तींना आकर्षित करेल, असे ते म्हणाले.

एनएसडीसीचे कार्यकारी उपाध्यक्ष अजय कुमार रैना यांनी या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. “आजचा दिवस जागतिक कौशल्याची राजधानी बनण्याच्या भारताच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याची संकल्पना आमच्या माननीय पंतप्रधानांनी मांडली होती. एनएसडीसी,बीएमसी आणि सीआयआय मधील ही भागीदारी व्यावसायिक आकांक्षा आणि व्यापक आर्थिक उद्दिष्टांसह संधींचे संरेखन करून भारतातील तरुणांना सक्षम बनवण्याची आमची अविचल बांधिलकीचे दर्शन घडवत आहे, असे ते म्हणाले.

कांदिवली पूर्वेला आकुर्ली व्हिलेजमध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 3440.68 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली आधुनिक G+5 इमारत आहे. सुरुवातीला,  फॅशन तंत्रज्ञान, एसी आणि रेफ्रिजरेशन, गेमिंग आणि ॲनिमेशन, क्विक सर्विस  रेस्टॉरंट्स आणि डेटा आणि सायबर सुरक्षा यासह उच्च-मागणी क्षेत्रातील पाच विशेष अल्प-मुदतीचे अभ्यासक्रम उपलब्ध असतील. उद्योगाकडून मिळणारे अभिप्राय आणि कर्मचाऱ्यांच्या नव्याने निर्माण होत असलेल्या गरजा यावर आधारित अभ्यासक्रमाच्या स्वरुपांचा अंगिकार करण्यासाठी हे केंद्र सज्ज आहे.

या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सीआयआय, नॅसकॉम आणि इतर विविध कौशल्य परिषदांकडून नाममात्र शुल्कामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे रोजगार उपलब्ध करून देण्याची त्याची बांधिलकी हे आहे. भारतीय उद्योग महासंघाने(सीआयआय) हे केंद्र  प्रगत प्रयोगशाळांनी सुसज्ज केले आहे आणि प्रशिक्षणानंतर यशस्वी उमेदवारांसाठी किमान 75% रोजगार सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. या कार्यक्रमात 500 लाभार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 20 उमेदवारांना ऑफर लेटरचे वाटप करण्यात आले.

सीआयआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन एम्प्लॉयमेंट अँड लाइव्हलीहुड आणि सीआयआय ग्रीन बिझनेस सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले हे केंद्र प्रशिक्षण प्रासंगिकतेच्या उच्च दर्जाचे पालन करेल. एनएसडीसी बृहन्मुंबई महानगरपालिकेला प्रशिक्षण पूर्ण होण्याचा आणि रोजगार दरांचा मागोवा घेण्यासाठी द्वि-वार्षिक अहवाल देईल, जागतिक दर्जाचे शिक्षण वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व परिचालनात्मक पैलूंचे व्यवस्थापन करेल.

हे सहकार्य कुशल कार्यबळ तयार करण्यासाठी, भारतातील तरुणांना सक्षम बनवण्यासाठी आणि राष्ट्रीय विकास आणि जागतिक स्पर्धात्मकतेमध्ये योगदान देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

 

* * *

PIB Mumbai | JPS/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2063007) Visitor Counter : 50


Read this release in: English , Urdu , Hindi