अंतराळ विभाग
अंतराळ स्टार्ट अप्सच्या साहस निधीसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती
‘अंतराळ क्षेत्रात एक आकडी स्टार्ट अपवरून आता आपल्याकडे 200 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत
अंतराळ क्षेत्रात 100% एफडीआयला अनुमती
Posted On:
06 OCT 2024 8:27PM by PIB Mumbai
अंतराळ स्टार्ट अप्सच्या साहस निधीसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ विभाग राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे. मोदी 3.0 च्या पहिल्या 100 दिवसात हा निर्णय घेण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अंतराळ क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याकडे निर्देश करणारा हा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात प्राधान्यक्रमाच्या पहिल्या तीन ते चार क्षेत्रांपैकी अंतराळ क्षेत्र एक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
चार वर्षांपूर्वी एक क्रांतिकारी पाऊल म्हणून अंतराळ क्षेत्र खाजगी उद्योजकांना खुले करण्याचा निर्णय घेतला, असे ते प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हणाले.
याचा परिणाम म्हणून या क्षेत्रात अतिशय मोठी प्रगती पाहायला मिळाली, एक आकडी स्टार्ट अपवरून अतिशय कमी कालावधीत आपण अंतराळ क्षेत्रात 200 पेक्षा जास्त स्टार्ट अप्सकडे झेप घेतली. केवळ इतकेच नव्हे तर भारताच्या काही अंतराळ स्टार्ट अप्समध्ये जागतिक क्षमता आहे आणि अशा प्रकारचे ते पहिलेच स्टार्ट अप आहेत. भारताचे पहिले खाजगी रॉकेट, विक्रम-एसचा त्यांनी दाखला दिला.
अंतराळ क्षेत्रात 100 टक्के परकीय थेट गुंतवणुकीच्या तरतुदीला सरकारने परवानगी दिली असल्याने नव्या उपक्रमांना आणि नव्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळू लागल्याचे सिद्ध झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
गगनयानचा संदर्भ देत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, आम्ही या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरूवातीस व्योम मित्र या यंत्रमानवासह अंतिम चाचणी उड्डाण करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून पुढील वर्षभरात म्हणजे 2025 मध्ये गगनयानद्वारे पहिल्या भारतीय मानवाला अंतराळात पाठवता येईल.
***
S.Kakade/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2062678)
Visitor Counter : 63