रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा उत्पादकतेवर आधारित बोनस द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 03 OCT 2024 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2024

 

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील  केंद्रीय मंत्रिमंडळाने 11,72,240 रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकतेवर आधारित बोनस (पीएलबी) म्हणून, कामाच्या 78 दिवसांकरता एकूण 2028.57 कोटी रुपयांना मंजुरी दिली.

ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, पॉइंट्समन, मंत्रालयांच्या सेवेतील कर्मचारी आणि इतर ग्रुप XC कर्मचारी यांसारख्या विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून ही रक्कम दिली जाईल.

पीएलबी साठी पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना ही रक्कम दरवर्षी दुर्गापूजा/दसऱ्याच्या सुट्टीपूर्वी वितरीत केली जाते. यावर्षी देखील, सुमारे 11.72 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतकी पीएलबी ची रक्कम दिली जात आहे.

78 दिवसांसाठी प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला दिली जाणारी कमाल रक्कम रु.17,951/- इतकी आहे. ही रक्कम विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचारी, जसे ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर्स, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, पॉइंट्समन, मंत्रालयांच्या सेवेतील कर्मचारी आणि इतर गट 'क' कर्मचारी यांना वितरीत केली जाईल.

2023-2024 या वर्षात भारतीय रेल्वेची कामगिरी खूप चांगली राहिली. रेल्वेने 1588 दशलक्ष टन इतकी विक्रमी मालवाहतूक केली, तर जवळजवळ 6.7 अब्ज प्रवासी वाहतूक केली.

या विक्रमी कामगिरीमध्ये अनेक घटकांचा हातभार लागला. सरकारने रेल्वेमध्ये विक्रमी कॅपेक्स (भांडवली खर्च) केल्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये झालेली सुधारणा, कामकाजातील कार्यक्षमता आणि उत्तम तंत्रज्ञान इत्यादी गोष्टींचा यात समावेश आहे.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2061769) Visitor Counter : 36