वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी वर्तमान आणि संभाव्य अमेरिकी गुंतवणूकदारांशी गुंतवणूकीच्या संधीविषयी केली चर्चा
पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज बैठक; अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी घेतल्या बैठका
Posted On:
01 OCT 2024 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2024
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांचा 30 सप्टेंबर 2024 रोजी अमेरिकेचा चार दिवसीय दौरा सुरू झाला. गोयल यांनी या दौऱ्याची सुरुवात वर्तमान आणि संभाव्य अमेरिकेतील गुंतवणूकदारांशी चर्चा करून त्यांना विविध क्षेत्रात असलेल्या संधींसाठी सहकार्याचे मार्ग अधोरेखित करून दिले.
गोयल यांच्या दौ-याच्या पहिल्या दिवशी भारतीय वाणिज्य दूतावासाने न्यूयॉर्कमध्ये विविध क्षेत्रातील युवा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय वंशाच्या उद्योजकांसोबत गोलमेज बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोयल होते. यावेळी झालेल्या संवाद सत्रामुळे तरुण उद्योजकांना भारतातील व्यावसायिक परिदृश्यावर त्यांचे विचार मांडता आले आणि सुधारणांसाठी त्यांनी सूचनाही दिल्या. मंत्री गोयल यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या परिवर्तनवादी सुधारणांवर भर दिला. गेल्या दशकभरात भारताच्या उल्लेखनीय विकासाला चालना मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिली आहे. भारताच्या अतुलनीय क्षमतेचा, विशेषतः उच्च-तंत्र उत्पादन आणि दर्जेदार उत्पादनाचा फायदा घेण्यासाठी आणि "मेक इन इंडिया" उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी गोयल यांनी अमेरिकन कंपन्यांना आमंत्रित केले.
दिवसभरात, गोयल यांनी उभय बाजूंनी सहकार्य करणे शक्य असलेल्या नवनवीन क्षेत्रांवर चर्चा करण्यासाठी अनेक सीईओंसमवेत थेट समोरा-समोर बैठका घेतल्या. विशेषत: प्रगत उत्पादन, औषध निर्माण, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत तंत्रज्ञान या क्षेत्रातील उद्योजकांशी गोयल यांनी चर्चा केली.
गोयल यांनी सह-मुख्य कार्यकारी अधिकारी चिंटू पटेल, आणि अम्नील फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष आणि सह-मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग पटेल यांची भेट घेतली. त्यांनी उच्च दर्जाच्या संशोधन आणि विकास यांच्यासाठी भारतातील औषध निर्माण क्षेत्रातील परिसंस्था विस्तारण्याच्या मार्गांची चाचपणी केली.
गोयल यांची कोहलबर्ग क्रॅव्हिस रॉबर्ट्स अँड कंपनी (केकेआर) चे सह-संस्थापक आणि सह-कार्यकारी अध्यक्ष हेन्री आर. क्रॅव्हिस यांच्याबरोबर एक फलदायी बैठक झाली. मंत्री गोयल यांनी भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, डेटा इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील संभाव्य गुंतवणुकीच्या संधींवर प्रकाश टाकला. त्यांनी गेल्या दशकात भारतातील सातत्यपूर्ण आर्थिक वाढ आणि धोरणात्मक गुंतवणुकीसाठी अनेक संधी उपलब्ध करून देणारी विशाल ग्राहक बाजारपेठ अधोरेखित केली.
वॉरबर्ग पिंकसचे अध्यक्ष, टिमोथी एफ. गेथनर यांनीही मंत्र्यांबरोबर चर्चा केली. ज्या क्षेत्रांमध्ये व्यवसाय करण्यासाठी सुलभतेमध्ये आणखी सुधारणा करण्यास वाव आहे. अशा विविध क्षेत्रांविषयी दोघांमध्ये चर्चा झाली.
सीएनबीसी ग्लोबल मार्केटच्या प्रतिनिधी, सीमा मोदी यांच्याशी भारतातील उदयोन्मुख संधी आणि भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत आर्थिक संबंधांवर मुक्त चर्चा झाली.
मंत्री गोयल यांच्या या दौ-यामुळे परस्पर वाढीसाठी सहयोग आणि गुंतवणूक वाढविण्याबरोबरच भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत संबंध अधोरेखित होत आहेत.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2060945)
Visitor Counter : 42