कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या सदस्यांबरोबर साधला संवाद

Posted On: 01 OCT 2024 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2024

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान  दर मंगळवारी शेतकरी आणि शेतकरी संघटनांशी संवाद साधत असतात, त्‍याप्रमाणे आज नवी दिल्ली येथे त्यांनी  शेतकरी संघटनांच्या सदस्यांशी चर्चा केली. चौहान यांनी शेतकरी संघटनांचे सर्व अध्यक्ष, निमंत्रक आणि शेतकरी बांधवांचे स्वागत केले. शेतीमालाचा खर्च कमी करणे, किफायतशीर भाव देणे, पाणी तुंबण्यापासून पिकांचे संरक्षण करणे, कीटकनाशके तसेच  उत्तम  बियाणांची उपलब्धता, जनावरांपासून पिकांचे संरक्षण कसे करावे,  अशा कृषी संबंधी विविध विषयांबाबत शेतकरी संघटनांशी  चर्चा करून,  त्यांना अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

कीटकनाशके आणि खतांच्या अनियंत्रित वापरामुळे जमिनीचा कस  बिघडल्याने शेतकरीही चिंतेत असल्याची माहिती  मंत्री चौहान यांनी दिली. सर्व शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी  त्यासंबंधीची माहिती सर्वांपर्यंत कशी पोहोचवता येईल, हेही सांगितले. माहितीअभावी अनेक वेळा शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचे कौतुक करून ती  चांगली असली  तरीही सर्वच शेतकऱ्यांना विमा काढता येत नाही, असे सांगितले. किसान क्रेडिट कार्डवर पैसे मिळण्याबाबतही यावेळी शेतकऱ्यांनी काही सूचना  केल्या. ट्रान्सफॉर्मर जळाला तर तो वेळेत बदलला पाहिजे, जेणेकरून पिकांच्या सिंचनावर परिणाम होणार नाही अशा अनेक व्यावहारिक समस्या शेतकऱ्यांनी मंत्र्यांपुढे मांडल्या. कारखान्यांमुळे शेतीला  येणारे दूषित पाणी आणि त्यामुळे पिके किंवा भूगर्भातील पाणी खराब होत असल्याची चर्चाही शेतकऱ्यांनी केली. आपल्यासाठी  ही चर्चा खूप उपयुक्त आहे कारण शेतकऱ्यांची सेवा करणे म्हणजे देवपूजा करण्यासारखे आहे, असे याप्रसंगी मंत्री चौहान म्हणाले.

WhatsApp Image 2024-10-01 at 17.50.38.jpeg

केंद्रीय मंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या या समस्या छोट्या दिसतात,  पण त्या सोडवल्या तर शेतकऱ्यांचे उत्पन्न 10 ते 20 टक्क्यांनी वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांना बनावट बियाणे मिळू नये, यासाठी कायदा अधिक कडक करण्यासारख्या केंद्र सरकारशी संबंधित समस्यांवर केंद्र सरकारतर्फे  विचार करण्‍याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ते पुढे म्हणाले की, यामध्‍ये राज्य सरकारांनी अनेक गोष्टी करण्‍यासारख्‍या  आहेत. त्यामुळे  शेतकऱ्यांशी निगडित सर्व सूचना आम्ही संबंधित राज्य सरकारांना पाठवू.

मंत्री चौहान म्हणाले की, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे लेखी नोंदी ठेवताना अडचणी येऊ नयेत, अशा सूचनाही शेतकऱ्यांनी दिल्या असून त्या अतिशय उपयुक्त आहेत. शेतकऱ्यांनी चर्चेसाठी येऊन आपल्या मौल्यवान सूचना दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्हाला मिळालेल्या सूचनांवर आम्ही एकत्र काम करू आणि समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारांसोबतही एकत्रित काम केले जाईल.

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2060795) Visitor Counter : 62


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Odia