महिला आणि बालविकास मंत्रालय
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी युनिसेफच्या सहकार्याने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बाल न्याय समितीच्या नेतृत्वाखाली आयोजित सल्लामसलतीच्या 9व्या फेरीत केले बीजभाषण
Posted On:
28 SEP 2024 6:28PM by PIB Mumbai
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज युनिसेफच्या सहकार्याने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बाल न्याय समितीच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या सल्लामसलतीच्या 9व्या फेरीत बीजभाषण केले. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील मथुरा मार्गावरील भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत पार पडला. सल्लामसलतीच्या या फेरीत दिव्यांगत्वाच्या आंतरविभागीयतेवर लक्ष केंद्रित केले गेले, ज्यामध्ये विधिसंघर्षग्रस्त बालके (CiCL) तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांवर (CNCP) विशेष भर देण्यात आला.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बाल न्याय समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना यांच्या उद्घाटनपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. न्यायमूर्ती नागरथना यांनी दिव्यांग मुलांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि या महत्त्वपूर्ण कार्यात सर्व हितसंबंधींच्या सामूहिक जबाबदारीवर भर दिला.
भारताचे सरन्यायाधीश, न्यायमूर्ती डॉ. धनंजय वाय. चंद्रचूड यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात, जिथे प्रत्येक बालक आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम असेल अशा सर्वसमावेशक समाजाच्या उभारणीच्या महत्त्वावर भर दिला.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आपल्या बीजभाषणात, दिव्यांग मुलांसमोरील बहुविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोनाच्या गरजेवर भर दिला.
या कार्यक्रमात, भारतातील युनिसेफ प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्री यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात, मुलांच्या विशेषत: सर्वात असुरक्षित मुलांच्या हक्क आणि कल्याणासाठी युनिसेफच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या कार्यक्रमात, लहान मुलांच्या हक्कांच्या संरक्षणासमोरची आव्हाने आणि यश दर्शविणारा एक माहितीपट दाखवण्यात आला, आणि त्यानंतर या आव्हानांवर गहन चर्चा झाली.
दिव्यांग व्यक्तींचे संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी प्रभावी उपाययोजना अंमलात आणण्याच्या हेतूने हितसंबंधींना मार्गदर्शन करण्यासाठी आरेखित केलेला महत्त्वपूर्ण स्रोत अर्थात दिव्यांग व्यक्तींशी संबंधित हस्तपुस्तिकेचे प्रकाशन हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2059913)
अभ्यागत कक्ष : 85