आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा 69 वा वर्धापनदिन संपन्न
Posted On:
25 SEP 2024 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2024
“नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ही भारतातील वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवा या क्षेत्रातील अग्रणी संस्था असून तिचा उत्कृष्टतेचा वारसा जगभरातील वैद्यकीय संस्थांना प्रेरणा देत आहे,"असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव गणपतराव जाधव म्हणाले.त्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) 69 व्या वर्धापनदिन दिन सोहळा पार पडला.
"एम्स नवी दिल्लीने अनेक उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत आणि जगातील सर्वोच्च श्रेणीतील वैद्यकीय संस्थांपैकी एक होण्याचे आपले ध्येय साकार करण्याचा त्यांचा निर्धार आहे,”असे यावेळी जाधव यांनी नमूद केले.नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कच्या (NIRF) सूची मध्ये सलग सातव्या वर्षी एम्स नवी दिल्ली ही संस्था भारतातील वैद्यकीय संस्थांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे, हे अधोरेखित करत केंद्रीय मंत्री म्हणाले, "या संस्थेने सतत असे प्रथम क्रमांकावर रहाणे,ही एक अत्यंत उल्लेखनीय कामगिरी आहे."
त्यांनी माहिती दिली की एम्स नवी दिल्ली आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नॅशनल मेडिकल कॉलेज नेटवर्कचे (NMCN) राष्ट्रीय संसाधन केंद्र म्हणून काम पहाते. यामुळे पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि निरंतर वैद्यकीय शिक्षण सुरू ठेवण्यासाठी 100 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंध जोडणे या संस्थेला शक्य झाले आहे."हे उद्दिष्ट गतवर्षी, सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण व्यवस्थापन आणि माहिती प्रणाली, सक्षम या (SAKSHYAM) प्रणाली द्वारे सुलभ केले जात आहे", असेही त्यांनी पुढे सांगितले.
एम्स नवी दिल्लीने आरोग्य सेवेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली आहे,असे जाधव यांनी अधोरेखित केले.त्यांनी नमूद केले की "एम्स भविष्यात शल्यविशारदांच्या प्रशिक्षणासाठी समर्पित 2 अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया उपकरणांसह सर्वात मोठे रोबोटिक शस्त्रक्रिया कौशल्य प्रशिक्षण केंद्र म्हणून लवकरच नावारूपास येईल."
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2058664)
Visitor Counter : 44