कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालयाने ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेचा एक भाग म्हणून मिलेनियम पार्क येथे "एक पेड माँ के नाम" उपक्रमात वृक्षारोपण मोहिमेचे केले आयोजन
Posted On:
21 SEP 2024 5:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2024
कोळसा मंत्रालयाने आज नवी दिल्लीतील मिलेनियम पार्क येथे "एक पेड माँ के नाम" उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवली. हा कार्यक्रम स्वच्छ आणि हरित पर्यावरणाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेचा एक भाग आहे.
कोळसा मंत्रालयाचे सचिव व्ही. एल. कांथा राव यांनी या वृक्षारोपण मोहिमेचे नेतृत्व केले आणि या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले. कोळसा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचे सामूहिक समर्पण प्रतिबिंबित करतो. या सहभागातून खाणकामात शाश्वत पद्धतींचा समावेश करण्याच्या मंत्रालयाच्या वचनबद्धतेची खातरजमा होते, तसेच देशाच्या स्वच्छ आणि हरित मोहिमेला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक पेड माँ के नाम" या दूरदर्शी मोहिमेचा एक भाग म्हणून, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी 25.07.2024 रोजी भारत कोकिंग कोल लिमिटेड, धनबाद येथे वृक्षारोपण अभियान 2024 चे उद्घाटन केले होते. अभियानाच्या उद्घाटनाच्या दिवशी, सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा आणि लिग्नाइट उपक्रमांनी एकत्रितरित्या 1 दशलक्ष रोपे लावली आणि वितरित केली होती. कोळसा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत, आणि आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 31.08.2024 पर्यंत 1,388 हेक्टर जमिनीवर आणि आसपासच्या खाण क्षेत्रात 33 लक्ष रोपांची लागवड केली आहे.
भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोळसा उत्पादन वाढवण्याबरोबरच, सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा आणि लिग्नाइट उपक्रमांनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी दृढ वचनबद्धता दर्शविली आहे. गेल्या पाच वर्षांत, त्यांनी कोळसा खाण क्षेत्रांमध्ये 10,942 हेक्टर जमिनीवर 240 लाख रोपे लावली आहेत, ज्याद्वारे ते हवामान बदलांशी लढा देण्यात, कार्बन उत्सर्जन कमी करण्यात आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
कोळसा मंत्रालय सातत्याने विविध उपक्रमांद्वारे शाश्वत विकासाला चालना देत आहे, ज्यात जमीन सुधारणे आणि इको-पार्क विकसित करणे समाविष्ट आहे. आजची वृक्षारोपण मोहीम एक आरोग्यदायी आणि स्वच्छ वातावरण प्राप्त करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, ज्यामुळे स्वच्छ भारताचा दृष्टीकोन साध्य होण्यास हातभार लागणार आहे.
* * *
M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057340)
Visitor Counter : 32