पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस: महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, मुंबईतील समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत झाले सहभागी


पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून कचरा पुनर्वापर स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

मुंबईत जुहू येथे व्यापक किनारपट्टी स्वच्छता मोहीम राबवून महाराष्ट्राने साजरा केला आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस

Posted On: 21 SEP 2024 3:45PM by PIB Mumbai

मुंबई, 21 सप्‍टेंबर 2024

 

"स्वच्छ आणि हरित ग्रह निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय युवा प्रणीत कचरा पुनर्चक्रीकरण स्टार्टअपसाठी एका वेळचे आर्थिक सहाय्य प्रदान करेल," केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज जुहू, मुंबई येथे किनारा स्वच्छता मोहिमेत भाग घेताना, कचरा पुनर्चक्रीकरण संयत्रे उभारण्यासाठी एक-वेळ देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. 21 सप्टेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC) यांनी पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जुहू चौपाटीवर व्यापक किनारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.

संसाधनांच्या योग्य वापराबाबत जाणीव असूनही आपण मानवप्राणी स्वच्छतेचे महत्त्व विसरतो, असेही मंत्र्यांनी नमूद केले. "निसर्ग उदारतेने आपल्याला शुद्ध संसाधने प्रदान करत असताना, आपण मात्र पृथ्वीला जी परतफेड करतो त्यात बहुतेकदा कचरा असतो," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जलसंवर्धन, घनकचरा कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रचार, सर्जनशील कचरा विल्हेवाट लावणे, कचरा व्यवस्थापनासाठी नवनवीन पद्धतींना प्रोत्साहन, निरोगी जीवनशैलीचा प्रचार, एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी आणि अन्न वाया घालवणे कमी करणे यांसारखी अनेक पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनुसार “एक पेड माँ के नाम” या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मंत्र्यांनी नागरिकांना प्रोत्साहित केले. ते पुढे म्हणाले, " जीवनाच्या संगोपनात आमच्या मातांच्या दुहेरी भूमिकेचे महत्त्व विचारात घेऊन,एक झाड लावून, आम्ही पृथ्वी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, " ते पुढे म्हणाले.

   

मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचे वचन देत कृतीशील पावले उचलण्यासाठी सरकार आणि मंत्रालय कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

या मोहिमेतील सहभागींना संबोधित करताना, महाराष्ट्राचे राज्यपाल, सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, केवळ एक दिवस काम करणे पुरेसे नाही. हा उपक्रम वर्षभर चालवला गेला पाहिजे आणि दरवर्षी त्याची पुनरावृत्ती झाली पाहिजे, कारण एक लहान प्रारंभ महत्त्वाचे परिवर्तन घडवू शकतो. "या प्रयत्नांमध्ये तरुणांना सहभागी करून, आम्ही "स्वच्छ मुंबई, हरित मुंबई" आणि शेवटी "स्वच्छ भारत, हरित भारत" या दिशेने काम करत आहोत,” ते म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या 720 किमी लांबीच्या किनारपट्टीवर आणि पर्यटनाला चालना देण्याची क्षमता अधोरेखित करत एक सेवा म्हणून स्वच्छतेच्या महत्त्वावर भर दिला. 17 सप्टेंबर रोजी गिरगाव चौपाटीवर राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांच्या सहभागाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, जी मोहीम 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

   

ही किनारपट्टी स्वच्छता मोहीम किनारपट्टीवरील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील इतर 100 हून अधिक समुद्रकिना-यांसोबत आयोजित केली जाते. स्वच्छ समुद्रकिनारे आणि सागरी परिसंस्था राखण्यासाठी नैसर्गिक स्वच्छतेचे महत्त्व आणि सांस्कृतिक जबाबदारी यावर भर देणाऱ्या या वर्षीच्या स्वच्छता मोहिमेची  "स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता" ही संकल्पना आहे.

ड्राइव्ह दरम्यान, सहभागींनी "आय ॲम सेव्हिंग माय बीच" ची शपथ घेतली आणि स्वच्छतेसाठी वचनबद्धता व्यक्त केली. हा सामुदायिक प्रयत्न पंतप्रधानांनी सुरू केलेल्या व्यापक राष्ट्रीय मोहिमेशी सुसंगत आहे, ज्यांनी स्वच्छतेला राष्ट्रीय प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. सहभागींनी मानवी साखळी देखील तयार केली आणि थेट समुद्रकिनारा साफ करण्याच्या प्रयत्नांमध्ये सक्रीय सहभाग घेतला.

पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी स्वागतपर भाषण केले. तन्मय कुमार, विशेष सचिव, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि  भूषण गगराणी, महानगरपालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार यांनी देखील या कार्यक्रमात मार्गदर्शन केले.

   

 

पार्श्वभूमीः 

किनारपट्टी स्वच्छता मोहिमेने तिची सुरुवात झाल्यापासूनच उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने(MoEFCC) 2018 मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त #IAM SAVING MY BEACH मोहीम सुरू केली, जी देशभरातील स्वच्छतेच्या विविध उपक्रमांच्या  नियमित मालिकेत विकसित झाली आहे. 2022 मध्ये, “स्वच्छ सागर, सुरक्षित सागर” या फलकाखालील मोहिमेत 15,000 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले. 75 समुद्रकिनाऱ्यांवरून 1,500 टनांपेक्षा जास्त कचरा गोळा करण्यात आला.

गेल्या वर्षी, G20 अध्यक्षपदाच्या काळात, लोकसहभागाच्या चळवळीने 14 G20 देश आणि विविध निमंत्रित राष्ट्रांच्या सहभागाने सामुदायिक सहभागाची व्याप्ती वाढवली. सामूहिक प्रयत्नांमुळे जागतिक पातळीवर 55 पेक्षा जास्त समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आले, ज्यामुळे पर्यावरण संवर्धनात आंतरराष्ट्रीय सहकार्याची ताकद दिसून आली. 

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस हा उपक्रम केवळ स्वच्छता मोहीम म्हणूनच काम करत नाही तर एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक व्यासपीठ म्हणूनही काम करत आहे. सागरी कचऱ्याच्या परिणामांबद्दल आणि आपल्या महासागरांचे संरक्षण करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणारा उपक्रम आहे. या वर्षीच्या मोहिमेमध्ये स्वाक्षरी मोहिमा, वृक्षारोपण आणि जागरूकतेचे दर्शन यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे, ज्यांचा प्लॅस्टिकचा वापर कमी करणाऱ्या आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणाऱ्या जीवनशैलीला प्रेरणा देण्याचा उद्देश आहे. एक केंद्रीकृत डेटाबेस यशस्वी कामगिरींचा मागोवा घेईल, पारदर्शकता सुनिश्चित करेल आणि सातत्याने समुदायांच्या सहभागाला प्रोत्साहन देईल.

 

* * *

PIB Mumbai | JPS/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2057319) Visitor Counter : 78


Read this release in: English , Urdu , Hindi