मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते काल दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी, गोवा इथे भारतीय पशुधन चारा मिश्रण उत्पादन संघाच्या (Compound Livestock Feed Manufactures′ Association - CLFMA) वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन
असंघटित दुग्धालय क्षेत्राला संघटित क्षेत्राचे स्वरुप देण्यासाठी तसेच चारा आणि पशुधनाच्या खाद्यान्नाची कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आखल्या आहेत - केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह
Posted On:
21 SEP 2024 1:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2024
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह यांनी काल दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी, गोवा इथे भारतीय पशुधन चारा मिश्रण उत्पादन संघाच्या (Compound Livestock Feed Manufactures′ Association - CLFMA) वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन केले. भारतीय पशुधन चारा मिश्रण उत्पादन संघाचे अध्यक्ष सुरेश देवरा, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाच्या अखत्यातरीतले पशुसंवर्धन आयुक्त डॉ. अभिजित मित्रा तसेच पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे माजी सहसचिव ओ. पी. चौधरी यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी या परिसंवादाच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. पशुपालन क्षेत्रातील देशांतर्गत उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच संबंधित आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने केलेले महत्वाचे प्रयत्न त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. असंघटित दुग्धालय क्षेत्राला संघटित क्षेत्राचे स्वरुप देण्यासाठी तसेच चारा आणि पशुधनाच्या खाद्यान्नाची कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या अनेक योजनांचा ही त्यांनी आपल्या संबोधनात उल्लेख केला. भारतीय पशुधन चारा मिश्रण उत्पादनाने या क्षेत्राशी संबंधित हाती घेतलेल्या उपक्रमांचीही त्यांनी प्रशंसा केली. आजपासून सुरु होत असलेल्या परिसंवादांमधली चर्चांसारख्या वैचारिक देवाणघेवाणीमुळे सरकारला धोरणे ठरवण्यात मदत होईल, अशी अपेक्षाही केंद्रीय मंत्री राजीव रंजन यांनी व्यक्त केली.
भारतीय पशुधन चारा मिश्रण उत्पादन संघाचे अध्यक्ष सुरेश देवरा यांनीही या सत्रात आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय अर्थव्यवस्थेत पशुधन क्षेत्राचे महत्त्व त्यांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले. पशुपालन क्षेत्रामुळे शेतकरी तसेच या क्षेत्राशी संबंधित घटकाला रोजगार उपलब्ध होतो असे ते म्हणाले. या उद्योग क्षेत्राची वार्षिक उलाढाल 12 लाख कोटी रुपये आहे, तसेच अंडी, मांस, दूध आणि चीज सारख्या उच्च दर्जाच्या पशुधनापासून मिळणाऱ्या उत्पादनांची जागतिक मागणी वाढत आहे अशी माहिती त्यांनी दिली.
पशुसंवर्धन आयुक्त डॉ. अभिजीत मित्रा यांनीही उपस्थितांसमोर आपले विचार मांडले. भारताच्या पशुधन क्षेत्राला लाभ व्हावा याकरता सरकार, उद्योग क्षेत्र तसेच संशोधन संस्था यांच्यात उत्तम समन्वय आणि सहकार्याची गरज आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमात भारतीय पशुधन चारा मिश्रण उत्पादन संघाच्या वतीने पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे माजी सहसचिव ओ. पी. चौधरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले.
* * *
JPS/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057281)
Visitor Counter : 56