पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
देशाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी आणि ब्राझीलचे खाण आणि ऊर्जा मंत्री यांचे दोन्ही देशांच्या ऊर्जा क्षेत्रातील परस्पर सहकार्याविषयी संयुक्त निवेदन
Posted On:
21 SEP 2024 11:55AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2024
संघराजीय ब्राझील प्रजासत्ताकचे खाण आणि ऊर्जा मंत्री ॲलेक्झांडर सिल्वेरा यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद देत, देशाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी 19 ते 21 सप्टेंबर या कालावधीसाठी ब्राझीलच्या दौऱ्यावर गेले आहेत. हरदीप सिंह पुरी यांच्यासोबत देशातील तेल आणि वायू कंपन्यांचे अपस्ट्रीम (तेल शोध आणि उत्खनन प्रक्रिया क्षेत्र) आणि डाउनस्ट्रीम (तेल उत्पादनानंतरची प्रक्रिया आणि ग्राहकांशी संबंधित विपण क्षेत्र) या दोन्ही क्षेत्राचे प्रतिनिधीदेखील या दौऱ्यावर गेले आहेत.
या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी ऊर्जा क्षेत्रातील विद्यमान परस्पर सहकार्याचा आढावा घेतला. याअंतर्गत अपस्ट्रीम क्षेत्रातली भारताची गुंतवणूक, परस्पर हिताची द्विपक्षीय व्यापारी संबंध, आणि शाश्वत इंधन, विशेषत: जैवइंधनासंदर्भातील परस्पर सहकार्य अशा मुद्यांचा समावेश होता.
तेल आणि वायू क्षेत्राशी संबंधित झालेल्या चर्चेअंतर्गत भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील तेल आणि वायू क्षेत्रावर दाखवलेल्या विश्वासाची दोन्ही बाजूंनी दखल घेतली. भारताने दाखवलेल्या या विश्वासामुळेच भारतीय तेल आणि वायू कंपन्यांकरता गुंतवणुकीसाठीचे ब्राझील हे जगातले सर्वात मोठे स्थान बनले आहे. ब्राझिलमधील भारतीय कंपन्यांच्या अस्तित्वाचा विस्तार करण्यासाठी शक्य त्या नव्या मार्गांचा शोध घेण्यावर या बैठकीत चर्चा झाली. याअंतर्गत मालमत्ता निर्मितीमधील गुंतवणुकीच्या नव्या संधींसारख्या मुद्याचाही समावेश होता. व्यापार क्षेत्रातील परस्पर पूरक गरजांचीही दोन्ही देशांनी दखल घेतली तसेच आणि दोन्ही देशांमधील व्यापारात वृद्धी साधण्यासाठी नव्या संधींचा शोध घेण्याबद्दलही वचनबद्धता दर्शवली.
जागतिक जैवइंधन आघाडीचे संस्थापक सदस्य या नात्याने, दोन्ही देशांनी जैवइंधनाला जागतिक ऊर्जा संक्रमणाचा एक प्रमुख घटक म्हणून स्थान मिळवून देण्यात ही आघाडी महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला. या सोबतच ही आघाडी पर्यावरणीय शाश्वततेसोबतच सामाजिक - आर्थिक विकासात देखील योगदान देईल याबद्दलची आश्वसतताही व्यक्त केली.
यावेळी भारताने ब्राझील जी20चे यजमानपद भूषवत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले, तसेच या निमित्ताने ब्राझीलने शाश्वत इंधन आणि ऊर्जा संक्रमणाच्या सामाजिक आयामांवर भर देण्याच्या त्यांच्या भूमिकेबद्दल आदर व्यक्त केला. जी20 परिषदेचा ब्राझीलचा नेतृत्वकाळ हा या परिषदेचे शाश्वत विकासाचे ध्येय आणि या ध्येयपूर्तीला भारताने 2023 मध्ये आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत दिलेल्या गतीला आणखी पुढे नेईल असा विश्वासही भारताने यावेळी व्यक्त केला.
फेब्रुवारी 2025 मध्ये भारत ऊर्जा सप्ताह 2025 च्या निमित्ताने समांतरपणे भारत - ब्राझील स्वच्छ स्वयंपाक मंत्रिस्तरीय बैठकीचे सहआयोजन करण्याबद्दलची उत्सुकताही दोन्ही देशांनी या बैठकीत व्यक्त केली. या बैठकीच्या आयोजनामुळे जागतिक पातळीवर स्वच्छ स्वयंपाकासाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्यात्मक मार्गाचा शोध घेण्याची संधी उपलब्ध होईल अशी आशा दोन्ही देशांनी व्यक्त केली.
यावेळी दोन्ही देशांनी भारतीय समुद्री क्षेत्रात खोलवर आणि अंतरंगात संशोधन करण्याच्या प्रक्रियेतील परस्पर सहकार्यावरही चर्चा केली.
यासोबतच महत्त्वाची खनिजे आणि त्यांची मूल्य साखळी क्षेत्रातील परस्पर सहकार्यावरही दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली.
* * *
JPS/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057258)
Visitor Counter : 53