दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारताने जागतिक सायबरसुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये टियर 1 दर्जा मिळवला
ही दिमाखदार कामगिरी जागतिक सायबरसुरक्षेप्रति असलेली देशाची अतूट वचनबद्धता प्रदर्शित करते : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया
भारताने 100 पैकी 98.49 गुणांसह, 'रोल-मॉडेलिंग' देशांच्या श्रेणीत स्थान मिळवले
Posted On:
20 SEP 2024 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2024
इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (आयटीयु), अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघटनेद्वारे प्रकाशित ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्स (जीसीआय) 2024, अर्थात जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2024 मध्ये भारताने टॉप टियर म्हणजेच टियर 1 दर्जा प्राप्त करून सायबर सुरक्षेबाबतच्या प्रयत्नांमध्ये महत्वाचा टप्पा गाठला आहे.
सायबर सुरक्षेत भारताने 100 पैकी 98.49 इतके भरघोस गुण प्राप्त करून, सायबर सुरक्षा पद्धतींबाबतची दृढ वचनबद्धता सिद्ध केली असून, जगातील ‘रोल-मॉडेलिंग’ अर्थात अनुकरणीय देशांच्या श्रेणीत स्थान मिळवले आहे.
दूरसंचार विभागाने (डीओटी) ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्स (जीसीआय) 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी नोडल एजन्सी म्हणून महत्वाची भूमिका बजावली.भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे नमूद करून, दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी,या कामगिरीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, “या अतुलनीय कामगिरीमधून सायबर सुरक्षेबद्दलची आपली अतूट बांधिलकी प्रतिबिंबित होत असून, भारताच्या दूरसंचार क्षेत्राचा उल्लेखनीय विकास दिसून येत आहे.”
जीसीआय 2024 अंतर्गत यापुढील पाच आधार स्तंभांवर आधारित राष्ट्रीय प्रयत्नांचे मूल्यांकन करण्यात आले : कायदेशीर, तांत्रिक, संस्थात्मक, क्षमता विकास आणि सहकार्य. सर्वसमावेशक प्रश्नावलीमध्ये 83 प्रश्नांचा समावेश होता, ज्यामध्ये 20 सूचक, 64 उप-सूचक आणि 28 सूक्ष्म-सूचकांचा समावेश होता. याच्या सहाय्याने प्रत्येक देशाच्या सायबरसुरक्षा परिप्रेक्षाचे सखोल मूल्यमापन सुनिश्चित करण्यात आले.
सायबर सुरक्षेमधील भारताच्या भरीव कामगिरीमागे, भारत सरकारने सायबर लवचिकता वाढवण्यासाठी आणि सायबर गुन्हेगारी कायदे आणि सायबर सुरक्षा मानकांसाठी मजबूत चौकट स्थापित करण्यासाठी केलेले अनेक उपक्रम आणि उपाय आहेत.
देशातील कायदे संस्था सायबर सुरक्षेपुढील आव्हानांचा आणि सायबर गुन्ह्यांचा सामना करून आपल्या डिजिटल पायाभूत सुविधांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सज्ज आहेत.
भारताच्या सायबर सुरक्षा धोरणात शिक्षण आणि जागरूकता केंद्रस्थानी आहे. लक्ष्य ठेवून आखलेल्या मोहिमा आणि शैक्षणिक उपक्रमांनी खासगी उद्योग, सार्वजनिक संस्था, नागरी समाज आणि शैक्षणिक संस्थांसह, सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षित ऑनलाइन पद्धतींना प्रोत्साहन दिले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमातील सायबरसुरक्षेचा समावेश, डिजिटल क्षेत्राबाबत जाणकार आणि सुसज्ज नागरिक तयार करण्याप्रति देशाचे समर्पण अधोरेखित करते.
याशिवाय, प्रोत्साहन आणि अनुदानांमुळे कौशल्य विकासाला चालना मिळाली असून, भारताच्या सायबरसुरक्षा उद्योगातील संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळाले आहे. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय करारांसह आंतरराष्ट्रीय सहकार्याने भारताच्या क्षमता-विकास आणि माहितीचे आदानप्रदान करण्याच्या प्रयत्नांना अधिक बळकटी दिली आहे, ज्यामुळे सायबरसुरक्षा क्षेत्रातील जागतिक नेता म्हणून भारताचे स्थान मजबूत झाले आहे.
जीसीआय 2024 मध्ये भारताची टियर 1 वर झेप, हे देशाच्या सायबर सुरक्षेमधील वाढत्या वचनबद्धतेचे स्पष्ट निदर्शक आहे. हे यश, केवळ भारत सरकारचे स्वतःचे डिजिटल क्षेत्र सुरक्षित ठेवण्याप्रति असलेले समर्पण दर्शवत नसून, इतर देशांसाठी एक मानदंड देखील प्रस्थापित करते.
दूरसंचार विभाग, भारताच्या जागतिक स्तरावर डिजिटल पायाभूत सुविधा सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांना पुढे नेत आहे.
S.Kakade/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057135)
Visitor Counter : 103