आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आयुष खाद्य उत्पादनांनी वर्ल्ड फूड इंडिया येथे जगभरातील अभ्यागतांना केले आकर्षित


“आयुर्वेदामध्ये जागतिक खाद्य परिदृश्य बदलण्याची क्षमता आहे”: सचिव,आयुष मंत्रालय

Posted On: 19 SEP 2024 9:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2024

आयुष मंत्रालयाने 19 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024 दरम्यान प्रगती मैदानावर आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2024 कार्यक्रमात आयुष दालनाच्या माध्यमातून आधुनिक पोषण आणि निरामयता याबाबतीत आयुर्वेद आणि भारतातील विविध पारंपारिक औषध प्रणालींची महत्त्वपूर्ण भूमिका प्रदर्शित केली.

आयुष मंत्रालयाच्या दालनात आयुर्वेद आहार ही संकल्पना प्रदर्शित करण्यात आली आहे जी पारंपरिक ज्ञानाला समकालीन खाद्य उपायांशी जोडते आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत आणि जगभरातील हितधारक  उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात आयुर्वेदाने प्रेरित भारताची समृद्ध खाद्य परंपरा आणि सध्याच्या जागतिक आरोग्य आव्हानांच्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रासंगिकता यावर भर  देण्यात आला.

वर्ल्ड फूड इंडिया 2024 च्या उद्घाटनाच्या दिवशी, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी आयुष दालनाला  भेट दिली आणि आयुर्वेदाला विशेषतः आधुनिक जीवनशैलीच्या संदर्भात मुख्य प्रवाहातील पोषण आणि निरोगीपणाबरोबर जोडण्याच्या महत्त्वावर भर दिला. सचिव म्हणाले  की, "आयुर्वेद आहार वैज्ञानिक आधार असलेला , काळाच्या कसोटीवर पारखलेला आहार उपाय आहे जो सर्वांगीण आरोग्याला चालना देतो.  प्राचीन ज्ञान जागतिक स्तरावर आणण्यासाठी वर्ल्ड फूड इंडिया हे एक परिपूर्ण व्यासपीठ प्रदान करते."

आयुष दालनाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यांसारख्या जीवनशैली संबंधित विकारांचा सामना करणाऱ्या आयुर्वेदिक आहारातील उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले विशेष प्रदर्शन समाविष्ट होते. सर्वांगीण आरोग्य आणि निरामयता  वाढवण्यासाठी आयुर्वेदिक सामग्रीचा रोजच्या जेवणात कसा समावेश केला जाऊ शकतो हे या प्रदर्शनात दाखवण्यात आले.

याव्यतिरिक्त, दालनामध्ये  आयुर्वेदानुसार  शरीराच्या निरनिराळ्या प्रकृतीआधारे वैयक्तिक आहार संबंधी सल्ला देत आयुर्वेदिक पोषण तज्ञांबरोबर थेट प्रात्यक्षिके आणि सल्लामसलत आयोजित करण्यात आली होती.

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने आयोजित केलेल्या वर्ल्ड फूड इंडिया 2024 मध्ये, अन्न आणि कृषी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय आणि भारतीय कंपन्या, धोरणकर्ते आणि प्रभावशाली व्यक्तींना एकत्र आणले. आयुष दालन अभ्यागतांना आयुर्वेदिक तत्त्वे दैनंदिन आहारात समाकलित करण्याचे आरोग्य फायदे जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने आयोजित केलेला वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रम 21 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रगती मैदान नवी दिल्ली येथे सुरू राहणार आहे.


N.Chitale/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2056836) Visitor Counter : 48


Read this release in: English , Urdu , Hindi