वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सरकारने बासमती तांदळावरील किमान दर (फ्लोअर प्राईस) केली रद्द
Posted On:
14 SEP 2024 9:33AM by PIB Mumbai
भारतातील एक प्रमुख जीआय तांदूळचा प्रकार असणाऱ्या बासमती तांदळाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भारत सरकारने या तांदळाच्या निर्यातीवरील किमान दर (फ्लोअर प्राईस) काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सद्य काळात सुरू असलेल्या व्यापारविषयक चिंता आणि तांदळाची पुरेशी देशांतर्गत उपलब्धता लक्षात घेऊन, भारत सरकारने आता बासमती तांदळाच्या निर्यातीवरील किमान दर पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बासमती तांदळाची कोणतीही अवास्तव किंमत टाळण्यासाठी आणि निर्यात पद्धतींमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) निर्यात करारांचे बारकाईने निरीक्षण करणार आहे.
तांदळाच्या अपुऱ्या देशांतर्गत पुरवठ्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देशात वाढत्या तांदळाच्या किमतींना प्रतिसाद म्हणून तसेच गैर-बासमती पांढऱ्या तांदळावर निर्यात बंदी लक्षात घेता, निर्यातीदरम्यान गैर बासमती तांदुळाला बासमती तांदूळ म्हणून पाठवण्यासंबंधी कोणत्याही संभाव्य चुकीच्या वर्गीकरणाला आळा घालण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनेच्या रुपात ऑगस्ट 2023 मध्ये 1,200 अमेरिकी डॉलर प्रति मेट्रिक टन, इतकी किमान किंमत लागू करण्यात आली होती. विविध व्यापारी संस्था आणि भागधारकांच्या विनंतीवरून, सरकारने ऑक्टोबर, 2023 मध्ये किमान किमतीला तर्कसंगत बनवत 950 अमेरिकी डॉलर प्रति मेट्रिक टन केले होते.
***
H.Akude/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054904)
Visitor Counter : 56