संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दल जोधपुरात करणार भारतीय संरक्षण हवाई वाहतूक प्रदर्शन-II चे आयोजन
Posted On:
11 SEP 2024 3:59PM by PIB Mumbai
तरंग शक्ती-24 ही सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय हवाई कवायतींपैकी एक कवायत भारतीय हवाई दल जोधपुरात करणार आहे. कवायतीला समांतर, हवाई दलाच्या वतीने भारतीय संरक्षण हवाई वाहतूक प्रदर्शन आयडॅक्स-24 भरवण्यात येत असून 12 सप्टेंबर 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
जोधपुरात 12 ते 14 सप्टेंबर या कालावधीत भरवण्यात येणाऱ्या आयडॅक्स-24 च्या आवृत्तीत उद्योगांचा मोठा सहभाग असेल आणि विविध उत्पादने, तंत्रज्ञान प्रदर्शनात मांडले जाईल. भारतीय प्रेक्षकांसह मित्र परराष्ट्रांमधील प्रेक्षकांसाठी ही भारतीय हवाई वाहतूक उद्योग जगतातील – डीपीएसयू, डीआरडीओ, खाजगी उद्योग (स्तर-I, II, III) आणि उच्च दर्जाच्या स्टार्टअप्सची उत्पादने पाहण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची ही संधी आहे. तरंग शक्ती 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या जागतिक हवाई दलांसह विविध निर्णयक्षम उपस्थितांना भारतीय हवाई वाहतूक उद्योगाच्या दुर्दम्य चैतन्य आणि स्वदेशी कौशल्याचे दर्शन घडवण्याचे आयडॅक्सचे उद्दीष्ट आहे. मित्र परराष्ट्रांचा प्रदर्शनातील सहभाग भारताच्या हवाई उद्योगाला निर्यातीच्या संधी मिळवून देण्यासाठी, परदेशी ओईएम्सच्या पुरवठा साखळ्यांशी जोडून घेण्याच्या आणि भारतीय संरक्षणाच्या गरजेनुसार उत्पादन व विकासात सहयोगाच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत करेल.
भारतीय हवाई दलाचे एअरोस्पेस डिझाईन संचालनालय (डीएडी) आपल्या भागीदार स्टार्टअप्ससह प्रदर्शनात सहभागी होणार आहे. मानवरहित हवाई यानांपासून असणारा धोका नष्ट करण्यासाठी, हाय अल्टिट्यूड स्युडो सॅटेलाईट्स (एचएपीएस), आरएफ गन, इतर हवाई शस्त्रास्त्रे व दारूगोळा, ऑगमेंटेड किंवा वर्च्युअल रिअॅलिटी (एआर/व्हीआर) स्मार्ट चष्मे आदी प्रशिक्षणाचे तंत्रज्ञानाधारित साहित्य, विस्तारक्षम सक्रीय प्रलोभने, हवाई दलातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर प्रत्यक्ष, थेट लक्ष ठेवण्याची प्रणालीपासून ते धावपट्टी झटपट दुरुस्तीसाठी उपाय आदी विविध ठराविक स्थानीय तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे प्रदर्शन हे स्टार्टअप उद्योग घडवतील अशी अपेक्षा आहे. त्यातून भारतीय एअरोस्पेस क्षेत्राची वाढती ताकद आणि सुप्तावस्थेतील क्षमता दिसून येईल.
नवोन्मेषी, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना नवनवे उपाय ओळखणे, विकसित करणे आणि अंमलात आणण्यासाठी प्रोत्साहन देण्यात भारतीय हवाई दलाचा वाटा लक्षणीय आहे. सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सल्ल्याद्वारे ‘डीएडी’ या उद्योगांना भारतीय हवाई दलाच्या भविष्यातील गरजा जाणून घेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारे त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रोत्साहन देत असून त्यातून सरकारला अपेक्षित ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने नेत आहे.
हवाई वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रातील उद्योगांमधील भागीदारांना भारतीय हवाई दलाचे नवोन्मेषी संचालनालय, निर्णायक पदांवरील व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी हे प्रदर्शन उत्तम व्यासपीठ आहे. तसेच, स्वदेशी बनावटीची उत्पादनेही या मंचावर पाहता येणार आहेत. देशाच्या आत्मनिर्भरतेच्या मोहिमेत भारतीय हवाई दलाचे भागीदार होण्यास इच्छुक असलेल्या व्यक्ती किंवा कंपन्यांनी अधिक माहितीसाठी https:\\idax24.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
***
S.Patil/R.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2053852)
Visitor Counter : 76