दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

दूरसंचार मंत्रालयाकडून दूरसंचार परवाने आणि वायरलेस उपकरणांसाठी मंजुरी प्रक्रिया सुलभ

Posted On: 10 SEP 2024 9:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2024


दूरसंचार विभागाने (डीओटी) प्रायोगिक परवाने,प्रात्यक्षिक परवाने आणि उपकरण प्रकार मंजूरी (ईटीए) जारी करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हे बदल दूरसंचार क्षेत्रातील व्यवसाय सुलभतेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहेत. विलंब कमी करून नियामक आवश्यकता सुलभ करणे, नवोन्मेषाला चालना देणे आणि व्यवसाय आणि दूरसंचार ऑपरेटर्ससाठी कार्यान्वयन सुव्यवस्थित करणे हे या सुधारणांचे उद्दिष्ट आहे.

प्रायोगिक परवान्यांसाठी (रेडिएटिंग श्रेणी), जलद मंजुरी सुनिश्चित करण्याकरिता निश्चित कालमर्यादा घालून दिल्या आहेत. आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत आवश्यक नसलेल्या प्रायोगिक परवान्यांच्या प्रकरणांसाठी, कोणताही निर्णय न दिल्यास 30 दिवसांनंतर परवाना जारी केला जाईल असे मानले जाईल. आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत आवश्यक असलेल्या प्रकरणांमध्ये, दूरसंचार विभाग संपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत अभिप्राय मागवेल. कोणतेही अभिप्राय प्राप्त न झाल्यास, 60 दिवसांनंतर तात्पुरता परवाना दिला जाईल, जो कोणत्याही प्रतिकूल सूचना नसल्यास 90 दिवसांनंतर नियमित परवान्यामध्ये बदलला जाईल.

त्याचप्रमाणे, प्रात्यक्षिक परवान्यांसाठी (रेडिएटिंग श्रेणी), आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत नसलेले परवाने 15 दिवसांनंतर मंजूर मानले जातील. ज्यांना सल्लामसलत आवश्यक आहे, त्यांना 45 दिवसांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागितल्यानंतर परवाने मंजूर केले जातील.

याव्यतिरिक्त, इतर लागू अटी आणि शर्ती कायम राहतील. मंजुरी प्रक्रियेदरम्यान कोणताही प्रतिकूल आंतर-मंत्रालयीन अभिप्राय प्राप्त झाल्यास, तात्पुरता परवाना रद्द केला जाईल आणि प्रयोग ताबडतोब थांबवला जाणे आवश्यक आहे. अर्जदारांनी प्रारंभिक अर्जाच्या वेळी या अटीशी सहमत असलेले हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. तात्पुरता किंवा नियमित परवाना रद्द झाल्यास, किंवा प्रायोगिक/प्रदर्शन कालावधी संपल्यानंतर, वापरकर्त्यांनी रेडिओ उपकरणे संबंधित ताबा नियमांनुसार संरक्षित केली आहेत, त्याच्या स्त्रोताकडे परत केली आहेत किंवा विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याचा निपटारा केला आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. दिनांक 23.07.2019 च्या कार्यालयीन ज्ञापनात नमूद केलेल्या इतर सर्व अटी व शर्ती लागू राहतील.

एका महत्त्वपूर्ण बदलात, परवाना-मुक्त वायरलेस उपकरणांसाठी उपकरण प्रकार मंजूरी (ईटीए) चे सर्व अर्ज आता स्वयं-घोषणा आधारावर मंजूर केले जातील. अर्जदार त्यांचे अर्ज एसएआरएएल संचार पोर्टल (https://saralsanchar.gov.in/) द्वारे दाखल करू शकतात, जिथे ते यशस्वीरित्या दाखल केल्यावर त्यांचे ईटीए प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात. या स्वयं-घोषणा प्रक्रियेमुळे मंजुरीसाठी लागणारा वेळ आणि मेहनत लक्षणीयरीत्या कमी होईल, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत वायरलेस उपकरणे तैनात करू पाहणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल.

अधिक माहितीसाठी कृपया https://dot.gov.in/spectrum-management/2457 यावर क्लिक करा.


S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2053593) Visitor Counter : 11


Read this release in: English , Urdu