वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-यूएई दरम्यानचे बंध हे दशकभरातील आणि भावी काळातील मैत्री, जिव्हाळा आणि बंधुत्वाचे द्योतक ठरतील: पीयूष गोयल
गणेशोत्सवादरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या युवराजांची भेट म्हणजे द्विपक्षीय संबंधांच्या नवीन अध्यायाचा शुभारंभ: गोयल
स्थानिक चलन समझोता, सीईपीए परिवर्तनकारी असून तो द्विपक्षीय संबंधांना नवी उंची देईल: गोयल
Posted On:
10 SEP 2024 7:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2024
भारत-यूएई दरम्यानचे बंध हे दशकभरातील आणि भावी काळातील मैत्री, जिव्हाळा आणि बंधुत्वाचे द्योतक ठरतील असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले. आज मुंबईत आयोजित यूएई-इंडिया बिझनेस फोरममध्ये ते बोलत होते. अबूधाबी चे युवराज महामहिम शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री महामहिम डॉ. थानी बिन अहमद अल झेउदी यांनीही या मंचाला संबोधित केले.
भारत-यूएई भागीदारी ही नवोन्मेष, गुंतवणूक आणि शाश्वत विकासाच्या आधारस्तंभांवर उभी आहे याकडे गोयल यांनी लक्ष वेधले. गणेशोत्सवाचे औचित्य नमूद करून मंत्री म्हणाले की, गणपती उत्सवादरम्यान युवराजांची भेट म्हणजे द्विपक्षीय संबंधांच्या नवीन अध्यायाचा शुभारंभ आहे.
या भागीदारीमध्ये भावी काळात उत्कृष्ट भविष्य आहे हे अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यूएईला भारताच्या विकासगाथेतील महत्त्वाचा भागीदार मानतात असे गोयल यांनी नमूद केले. युवराजांची भेट ही एका वर्षापेक्षा कमी कालावधीतील 6 वी उच्चस्तरीय भेट असून या भागीदारीचे द्योतक आहे असे मंत्र्यांनी निदर्शनास आणले.दोन्ही बाजूंच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील भागीदारी मोठे परिवर्तन घडवून आणेल, असे ते म्हणाले. हे परिवर्तन युएई च्या 50 वर्षांच्या ध्येयधोरणाशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतील भारताच्या विकसित भारत@2047 या परिवर्तनकारी प्रवासाशी सुसंगत आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय स्थानिक चलन सेटलमेंट, JAFZA (जेबेल अली फ्री झोन), दुबई येथे उभारण्यात येणारे भारत मार्ट आणि व्यापारविस्तार करण्यासाठी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) यासह व्यापाराला चालना देण्यासाठी दोन्ही बाजूंनी घेतलेल्या पुढाकारांचे गोयल यांनी कौतुक केले. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही भागीदारी अधिक पुढे नेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व भागधारकांनी गुणतंवणूकीच्या संधी आणि व्यापाराच्या शक्यता आजमावण्याचा दृष्टीने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गोयल यांनी युएईच्या नेतृत्वाबद्दल युवराजांचे कौतुक केले आणि युवराजांच्या नेतृत्वाखाली झालेल्या परिवर्तनाचे कौतुक केले. भारत आणि यूएई यांच्यातील भागीदारी आता अधिक परिपक्व झाली असून हे बंध आता कधीही तुटणार नाहीत इतके दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले. युवराजांनी राजघाट येथे भेट देणे ही एक ऐतिहासिक घटना असून त्यांचे पिता आणि आजोबा यांच्याप्रमाणे आता तिसऱ्या पिढीतील युवराजांनीही तेथे एक रोपटे लावले, असे गोयल म्हणाले.
या फोरमची संकल्पना ‘व्यापक आर्थिक भागीदारी कराराच्या पलीकडे: नवोन्मेष आणि भविष्यासाठी तयार अर्थव्यवस्था’ अशी होती, यात आरोग्यसेवा, जैवतंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, शाश्वतता इत्यादींच्या संभाव्यतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
S.Patil/V.Joshi/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2053531)
Visitor Counter : 51