संरक्षण मंत्रालय

मनिला येथे होणाऱ्या 5 व्या भारत-फिलीपाईन्स संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीचे संरक्षण सचिव भुषवणार सह-अध्यक्षपद.

Posted On: 10 SEP 2024 8:47AM by PIB Mumbai

संरक्षण सचिव गिरीधर अरमाने 11 सप्टेंबर 2024 रोजी, भारत-फिलीपाईन्स संयुक्त संरक्षण सहकार्य समिती (JDCC) च्या पाचव्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भुषविण्यासाठी मनिलाच्या दौऱ्यावर जात आहेत. अरमाने यांच्या सोबतीने फिलीपिन्सच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अवर सचिव इरिनो क्रूझ एस्पिनो या बैठकीचे सह-अध्यक्ष असतील.

या भेटीदरम्यान संरक्षण सचिव दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील.  ते फिलिपाइन्स सरकारच्या इतर मान्यवरांचीही भेट घेणार आहेत.

भारत आणि फिलीपिन्सच्या राजनैतिक संबंधांची 75 वर्षे आणि भारताच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणाची 10 वर्षे पूर्ण होण्याचा उत्सव साजरा होत असताना संरक्षण सचिवांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.  दोन्ही देशांचे संबंध मजबूत आणि बहुआयामी आहेत. या दृढ संबंधांचा संरक्षण आणि सुरक्षेसह अनेक धोरणात्मक क्षेत्रात विस्तार झाला आहे. संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन्ही देश एकमेकांना समर्थन देण्यासाठी वचनबद्ध आहेत.

2006 मध्ये दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य कराराच्या कक्षेत संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची (JDCC) स्थापना करण्यात आली आहे. संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीची चौथी आवृत्ती मार्च 2023 मध्ये नवी दिल्ली येथे संयुक्त सचिव स्तरावर आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीची पाचवी आवृत्ती सह-अध्यक्षतेला उन्नत करून सचिव स्तरावर पोहोचवणे अधोरेखित करते. 

***

NM/SMukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2053400) Visitor Counter : 15