वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाहनांचे सुटे भाग उत्पादीत करणारे क्षेत्र 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर मूल्याच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गावर - पीयूष गोयल
जागतिक स्तरावर अग्रेसर राहण्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करण्याचे गोयल यांनी वाहन उद्योगाला केले आवाहन
वाहनांचे सुटे भाग उत्पादीत करणाऱ्या उद्योगाला संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मंत्र्यांनी दिले प्रोत्साहन
Posted On:
09 SEP 2024 8:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2024
वाहनांचे सुटे भाग उत्पादीत करणारे क्षेत्र 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर मूल्याच्या निर्यातीचे लक्ष्य गाठेल आणि हे क्षेत्र देशातील सर्वात मोठे रोजगार निर्माण करणारे क्षेत्र बनेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. ते आज नवी दिल्लीत ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ACMA) च्या 64 व्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते.
भारत सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) बाबतीत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रगती करत असताना,सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ असणाऱ्या वाहन क्षेत्रानेही जागतिक स्तरावर अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही गोयल म्हणाले.हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक मार्गदर्शक आराखडा तयार करण्याचे आवाहन त्यांनी वाहन उद्योग प्रमुखांना केले.
मंत्र्यांनी उद्योग सदस्यांना संशोधन आणि विकासावर (R&D) लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले. 1 लाख कोटी रुपयांच्या अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाऊंडेशन (ANRF) निधीचा लाभ घेण्याचे आवाहन गोयल यांनी उपस्थितांना केले आणि वाहन क्षेत्रातील सार्वजनिक-खाजगी शैक्षणिक भागीदारीला मदत करण्यासाठी या निधीचा वापर करण्याची सूचना दिली.
भारताचे वाहन क्षेत्र परदेशातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे आणि हा उद्योग युरोपियन मुक्त व्यापार संघटनेतील (EFTA) देशांमधून गुंतवणूक आजमावू शकतो, असे त्यांनी सांगितले. भारताने नवीन युगातील तंत्रज्ञान जसे की इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि त्याच्याशी संबंधित परिसंस्था तसेच सायकल क्षेत्रासारख्या भविष्यातील संधींचा लाभ घेण्यासाठी तयार असले पाहिजे, हे गोयल यांनी अधोरेखित केले.
सरकारचा अलीकडील उपक्रम असलेल्या औद्योगिक स्मार्ट शहरांचा स्वतःच्या विकासासाठी आणि निर्यात प्रोत्साहनासाठी उपयोग करण्याचे निमंत्रण गोयल यांनी उपस्थितांना दिले. त्यांनी उद्योगांना स्वदेशी पुरवठादार बनण्याचे तर उत्पादकांना वाहनांच्या सुट्या भागाचे अग्रणी निर्यातदार बनण्याचे आवाहन केले.
2047 पर्यंत देशाला 'विकसित भारत' बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला.
देशाला ‘आत्मनिर्भर भारत’ (आत्मनिर्भर भारत) बनवण्याच्या दिशेने सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे बदल घडून येत असल्याचे गोयल यांनी सांगितले. गोयल यांनी उद्योगातील भागधारकांनी ग्राहकांना,विशेषत: व्यावसायिक वाहनांच्या मालकांना, OEM (मूळ उपकरणे उत्पादक) उत्पादनांच्या वापराबाबत शिक्षित करण्याचे आवाहन केले. ओईएम उत्पादने त्यांच्या पैसा वसूल, गुणवत्ता, किफायतशीरता आणि दीर्घायुष्य या फायद्यासाठी वापरली जावीत,असे ते म्हणाले.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी आज नंतरच्या सत्रात या कार्यक्रमाला हजेरी लावली.निर्यातीला चालना देण्यासाठी त्यांनी वाहनांचे सुटे भाग उत्पादीत करणाऱ्या क्षेत्राला प्रोत्साहन दिले.देशातील वाढत्या वाहन क्षेत्राचा लाभ सुटे भाग क्षेत्राला होत असल्याचे त्यांनी सांगितले.सहभागींनी देशात अधिक रोजगार निर्माण करावेत असे आवाहन त्यांनी केले.जितिन प्रसाद यांनी पुढे नमूद केले की वाहन उद्योगाचे प्रयत्न,कौशल्य आणि तंत्रज्ञान केंद्रित धोरणांमध्ये सरकारच्या प्रयत्नांना पूरक ठरतील.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2053246)
Visitor Counter : 43