वस्त्रोद्योग मंत्रालय

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते फॅशनचा आगाऊ अंदाज वर्तवणारा भारताचा पहिला उपक्रम ‘व्हिजनएक्सटी’चे उद्घाटन

Posted On: 05 SEP 2024 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2024

 
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज ‘व्हिजनएक्सटी – फॅशन फोरकास्टिंग इनिशिएटिव्ह’ अर्थात फॅशनचा आगाऊ अंदाज वर्तवणाऱ्या द्विभाषिक संकेतस्थळाचे आणि भारत-केंद्रित फॅशनच्या कलाविषयी पुस्तक ‘परिधी 24x25’चे उद्घाटन केले. संकेतस्थळाची निर्मिती ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ (एनआयएफटी) ची आहे.उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय वस्रोद्योग आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा आणि वस्त्रोद्योग सचिव रचना शाह उपस्थित होत्या.

आपल्या भाषणात गिरीराज सिंह म्हणाले की व्हिजनएक्सटी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनांतर्गत साकारला आहे. 2014 नंतर भारताने वस्त्रोद्योगात स्वदेशी कला आणि उत्पादनाला प्राधान्य दिले त्याचे व्हिजनएक्सटी हे फलित आहे.

वेगाने बदलत्या फॅशनच्या काळात, व्हिजनएक्सटी उपक्रमामुळे चांगल्या जागतिक स्पर्धेला वाव मिळेल आणि भारतीय संस्कृती आणि वस्त्रोद्योग कला जागतिक स्तरावर नवी उंची गाठेल, असे सिंह म्हणाले. फॅशन उद्योगाला व्हिजनएक्सटीकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि भावनिक बुद्धिमत्ता (ईआय) आधारित फॅशनच्या बदलत्या कलाचा अंदाज मिळाल्याचे फायदे होतील, असे सांगून सिंह यांनी ही सेवा भारताला जागतिक फॅशन क्षेत्रात नेतृत्व मिळवून देईल, असे सांगितले.

एनआयएफटी व्हिजनएक्सटी हा भारताचा पहिलाच उपक्रम आहे ज्यामध्ये एआय आणि ईआय तंत्रज्ञान एकत्र करून भविष्यातील फॅशनच्या कलाचा अंदाज वर्तवण्यात येणार आहे. भारतातील सकारात्मक अनेकता, सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक-आर्थिक बारकावे लक्षात घेऊन प्रादेशिक कल ओळखून, त्यांचे विश्लेषण करून ते नकाशावर नोंदवून, फॅशन विश्वाचा एकंदर कल आणि अंतरंगांचा अंदाज घेणे असे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

फॅशनचा अंदाज वर्तवण्याच्या क्षेत्रात भारताच्या प्रवेशाचे अनेक फायदे आहेत. जगातील इतर फोरकास्टिंग सेवा पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करणे शक्य होईल, भारतीय ग्राहकाच्या आवडीनिवडीचे अंतरंग उलगडून मांडता येतील, वस्त्रोद्योगात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या भारताच्या क्षमतेत भर आणि कृत्रिम व मानवी बुद्धिमत्ता यांचे एकत्रीकरण.

विणकर, उत्पादक, किरकोळ विक्रेते, देशांतर्गत व्यवसाय आणि उद्योजक, फॅशन ब्रँड्स यांना पाठबळ देण्यासाठी हा अहवाल व्हिजनएक्सटी पोर्टल  वर हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहे. या उपक्रमाच्या वापरकर्त्यांना वैविध्यपूर्ण देशातील ग्राहकांची आवड केंद्रस्थानी ठेवून कपड्यांचे डिझाईन, उत्पादन करणे शक्य होईल. व्हिजनएक्सटीने मांडलेला पहिला समावेशी फॅशनचा कल ‘परिधी’ने नोंदवला असून भारत-केंद्रित फॅशनचा कल संकेतस्थळामार्फत प्रसारित करण्यात येईल.


S.Patil/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2052385) Visitor Counter : 43


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi