विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ‘आंतरराष्ट्रीय साहित्य अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान परिषदे’ला केले संबोधित
ऊर्जेपासून संरक्षणापर्यंत : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली प्रगत साहित्य संशोधनात भारताची उत्तुंग झेप,केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह
अनुसंधान एनआरएफ : पंतप्रधान मोदींच्या सहाय्याने भारताच्या संशोधन पुनर्जागरणात अग्रेसर -डॉ जितेंद्र सिंह यांनी केले अधोरेखित
विकसित भारताची उभारणी: प्रगत सामग्रीमध्ये भारताच्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला उत्प्रेरित करणे -विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.सिंह यांची घोषणा
Posted On:
04 SEP 2024 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2024
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज 4 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या "आंतरराष्ट्रीय साहित्य अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच सिनर्जिक हीट ट्रीट (HTS)परिषद आणि प्रदर्शन" मध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे बीजभाषण केले.
एएसएम इंटरनॅशनल, इंडिया चॅप्टरने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्यासाठी 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संशोधक सहभागी झाले आहेत. एएसएम इंटरनॅशनल ही अमेरिकेतील ओहियो इथे मुख्यालय असलेली 108 वर्षे जुनी संस्था असून स्थापनेपासून साहित्य विज्ञान आणि अभियांत्रिकी समुदायाच्या सेवेप्रति समर्पित आहे. 1979 मध्ये स्थापन इंडिया चॅप्टर हा जगभरातील सर्वात सक्रिय चॅप्टर्स पैकी एक म्हणून ओळखला जातो.

आपल्या भाषणात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार),भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय , अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये प्रगत सामग्री बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला,ज्या त्यांच्या मूलभूत गुणधर्मांमुळे आणि विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी वर्धित सानुकूलनामुळे विविध उपाय आणि संधी पुरवतात. ऊर्जा, आरोग्यसेवा, अंतराळ, कृषी आणि संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवणारे मूल्यवर्धन म्हणून त्यांनी नॅनोस्ट्रक्चर्ड पेरोव्स्काईट्सपासून ते मॅक्रो-स्केल पॉलिमर पर्यंतच्या अभिनव , टिकाऊ सामग्रीच्या विकासाचा उल्लेख केला.
डॉ.जितेंद्र सिंह यांनी प्रगत साहित्य संशोधनामध्ये कम्प्युटेशनल मॉडेलिंग, मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्रित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. "यामुळे नवीन गुणधर्म असलेल्या सामग्रीच्या शोधकार्यात गती येईल जी अन्यथा प्राप्त करणे कठीण होते," असे डॉ. सिंह म्हणाले. ते पुढे म्हणाले की हे एकत्रीकरण अशा सामग्रीवर आधारित तंत्रज्ञानाच्या विकासाला मोठी चालना देईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना डॉ. सिंह म्हणाले, "भारतात सध्या उच्च कार्यक्षमता असलेल्या सामग्रीच्या मागणीत लक्षणीय वाढ होत आहे." त्यांनी या मागणीचे श्रेय जगभरातील वाढते संशोधन आणि विकासाचे प्रयत्न आणि व्यापारीकरणाला दिले. ही प्रगत सामग्री बाजारपेठेसाठी तयार झाल्यावर, अक्षय ऊर्जा, ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, आरोग्यसेवा, शेती आणि यासारख्या अनेक उद्योगांमध्ये त्याचा वापर होईल. डॉ. सिंह यांनी ऊर्जा क्षेत्रातील स्वच्छ ऊर्जेच्या वाढत्या मागणीकडे लक्ष वेधले, ज्यामुळे ऊर्जा साठवण, पवन आणि सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्राची क्षमता वाढली.
डॉ.सिंह यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्रगत साहित्यावरील उपक्रमावरही प्रकाश टाकला, ज्याचे उद्दिष्ट हवामान बदलाचे संकट, पर्यावरणाचा ऱ्हास, आणि शेती, वाहतूक, बांधकाम आणि पॅकेजिंगमधील अशाश्वत पद्धती यासारख्या महत्त्वाच्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन साहित्य आणि तंत्रज्ञान विकसित करणे, हे आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी, संशोधन नॅशनल रिसर्च फाऊंडेशन (एनआरएफ) च्या स्थापनेसाठी पंतप्रधान मोदी यांनी दिलेले समर्थन आणि सहाय्य अधोरेखित केले. “एनआरएफ ही भारतीय संशोधन क्षेत्रातील मोठी झेप आहे. हे पारदर्शक पद्धतीने सर्व संस्थांच्या सर्व विद्या शाखांमधील संशोधनाची एकात्मिक सुरुवात, निधी पुरवठा आणि समन्वय साधायला सहाय्य करेल,” ते म्हणाले.

अनुसंधान एनआरएफ, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील संशोधन आणि नावोन्मेशाला चालना देण्यासह, भारतीय संशोधन आणि विकास परिसंस्थेला अधिक गतिशील, सक्षम आणि उत्पादनक्षम बनवून त्यामध्ये बदल घडवेल, अशी अपेक्षा आहे.
डीप टेक आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील संशोधन आणि नवोन्मेश लक्षणीयरीत्या वाढवण्यासाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात रु. 1 लाख कोटी खर्चाच्या उपक्रमाला अर्थसहाय्य घोषित केल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्तावित निधी, 50 वर्षांच्या व्याजमुक्त कर्जासह उपलब्ध करण्यात आला असून, त्याद्वारे खासगी क्षेत्राने हाती घेतलेले संशोधन आणि नवोन्मेषाला व्यावसायिक स्तरावर चालना देण्यासाठी अल्प अथवा शून्य व्याज दराने दीर्घकालीन वित्तपुरवठा उपलब्ध केला जाईल, असे ते म्हणाले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आघाडीवर संशोधन आणि विकास परिसंस्था बळकट करत आहोत," डॉ. सिंह यांनी पुनरुच्चार केला."पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातील विकसित भारताची उद्दिष्टे साध्य करणे, हे आमच्या सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे," असे सांगून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
S.Patil/S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2051931)