मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मच्छिमार लाभार्थ्यांना ट्रान्सपॉन्डर सेट आणि किसान क्रेडिट कार्डचे वाटप केले

मच्छिमारांना मोफत ट्रान्सपॉन्डर दिले जातील; ट्रान्सपॉन्डर प्रणाली संपूर्ण मत्स्य उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवून आणेल:  पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन

Posted On: 30 AUG 2024 6:17PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील पालघरमध्ये विविध  विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

आजच्या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यपालन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीचा समावेश आहे. मोदी यांनी  देशभरात  सुमारे 360 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या  जहाज संप्रेषण आणि मदत प्रणालीचा प्रारंभ केला. तसेच मासेमारी बंदरांचा विकास, उन्नतीकरण  आणि आधुनिकीकरण, फिश लँडिंग सेंटर आणि मासळी बाजारांच्या  बांधकामासह महत्त्वाच्या मत्स्यव्यवसाय संबंधी  पायाभूत सुविधा प्रकल्पांचीही पंतप्रधानांनी पायाभरणी केली. त्यांनी मच्छिमार लाभार्थ्यांना ट्रान्सपॉन्डर सेट आणि किसान क्रेडिट कार्डचे वाटप केले.

जेव्हा समुद्राशी संबंधित संधींचा मुद्दा येतो  तेव्हा भारतातील मच्छिमार समुदाय हा सर्वात महत्त्वाचा भागीदार आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.

मत्स्यपालन क्षेत्रात महिलांच्या सहभागाला चालना देण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न अधोरेखित करत  पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत हजारो महिलांना मदत केल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

महाराष्ट्रात पालघर येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या योजनांमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे  सुमारे 5 लाख 25 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेने मत्स्य उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. गेल्या 9 वर्षात मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ झाल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मासळी निर्यातीतही वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये मासळी निर्यात केवळ 30,213 कोटी रुपये होती, ती आता 60,523 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जगातील 123 देशांमध्ये मासे निर्यात केले जातात आणि सर्वात मोठा आयातदार देश अमेरिका असून तो  आपली सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

केंद्रीय मंत्री राजीव रंजन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात विकसित ट्रान्सपॉन्डरचा प्रारंभ केला असून जहाजावरील मच्छिमारांना ते मोफत दिले जाईल, जे कोणत्याही अँड्रॉइड  फोनशी जोडता येऊ शकते.  या ट्रान्सपॉन्डर प्रणालीच्या माध्यमातून मच्छिमार त्यांच्या कुटुंबीयांशी 6 उपग्रहांद्वारे जोडले जाणार असून, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क  साधू शकतील असे ते म्हणाले.

या ट्रान्सपॉन्डरच्या माध्यमातून मच्छिमारांना समुद्रात कोणत्या भागात जास्त मासे उपलब्ध आहेत याची माहिती दिली जाणार आहे, जेणेकरून मच्छीमारांना आणि जहाजांना दूरवर भटकावे लागणार नाही, तिथे मासेमारी करता येईल आणि  त्यांचे उत्पन्न देखील वाढेल. या ट्रान्सपॉन्डरच्या माध्यमातून मच्छिमारांना समुद्रात उद्भवणाऱ्या  धोक्यांची माहिती कळवली जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच सागरी सीमा ओलांडण्यापूर्वी त्यांना सावध केले जाईल. ट्रान्सपॉन्डर प्रणाली संपूर्ण मत्स्य उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवून आणेल.  पंतप्रधानांनी मत्स्य उत्पादनात सहभागी  लोकांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देखील प्रदान केली आहे असे राजीव रंजन सिंह म्हणाले .

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2050295) Visitor Counter : 69


Read this release in: English , Urdu , Hindi