शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा दृष्टीकोन साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल, ब्रिटनमधील साउथॅम्पटन विद्यापीठाला भारतात केंद्र सुरू करण्यासाठी इरादा पत्र; डॉ. एस जयशंकर यांची उपस्थिती


‘विश्वबंधू’ म्हणून भारत आपल्या जागतिक दायित्वाची पूर्तता करण्यासाठी आणि शिक्षण, नवोन्मेष आणि प्रगतीसाठी उज्ज्वल भवितव्य घडवण्याकरता वचनबद्ध – धर्मेंद्र प्रधान

Posted On: 29 AUG 2024 9:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑगस्ट 2024

 

राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या दृष्टीपथावर वाटचाल करण्यासाठी आंतरराष्ट्रीयीकरणाचे ध्येय साकार करण्याच्या दिशेने शिक्षण मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे.  ब्रिटनमधील साउथॅम्पटन विद्यापीठाला भारतात केंद्र स्थापन करण्यासाठी मंत्रालयाने इरादा पत्र दिले आहे. सर्वोच्च क्रमवारीतील पहिल्या 100 उच्च शिक्षण संस्थांमध्ये साउथॅम्पटन विद्यापीठाचा क्रमांक लागतो. भारतात या विद्यापीठाचे केंद्र आल्यास देशातील शिक्षणाच्या सुविधांमध्ये मोलाची भर पडेल आणि विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांसह जागतिक स्तरावरील शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. भारतात परदेशी विद्यापीठांनी केंद्र स्थापन करण्याबाबत यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीअंतर्गत इरादा पत्र दिलेले साउथॅम्पटन विद्यापीठ पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

नवी दिल्ली इथे आज आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण – भारतात परदेशी विद्यापीठाची स्थापना’ या कार्यक्रमात साउथॅम्पटन विद्यापीठाला उद्देश पत्र देण्यात आले.

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

डॉ. एस जयशंकर आपल्या भाषणात म्हणाले की आपली शिक्षणाचा दर्जा सर्वोच्च जागतिक स्तरावर नेण्याची दृष्टी आणि भारत-ब्रिटन  यांच्यातील सहकार्याची व्याप्ती शिक्षण क्षेत्रात नेण्याचा हेतू या निर्णयाने दर्शवला आहे. अशा उपक्रमांमुळे आपला युवा वर्ग कार्यबलासाठी तयार होईल आणि जागतिक सामंजस्य व सहकार्याची भावना जोपासेल, असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे भारताची जगात शिक्षण क्षेत्रातही भक्कम परस्परसंवादी प्रतिमा निर्माण करण्यास मदत होईल, याकडे परराष्ट्र मंत्र्यांनी लक्ष वेधले.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आपल्या X वरील संदेशात म्हणाले की हा उपक्रम म्हणजे एनईपी 2020 ने मांडलेल्या दृष्टीपथानुसार ‘घरात आंतरराष्ट्रीयीकरणा’चे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे. ‘विश्वबंधू’ म्हणून भारत आपल्या जागतिक जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्यास आणि शिक्षण, नवोन्मेष आणि प्रगतीसाठी उज्ज्वल भवितव्य उभारण्याकरता वचनबद्ध आहे, असे त्यांनी नमूद केले.

भारतात साउथॅम्पटन विद्यापीठाचे केंद्र स्थापन झाल्यास ते अभ्यासक्रम जागतिक स्तरावर नेण्याच्या दृष्टीने आणि अशा अभ्यासाच्या संधी भारतात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, तसेच संशोधन, ज्ञानाची देवाणघेवाण, उपक्रम व प्रतिबद्धता याकरता विद्यार्थ्यांना फायद्याचे ठरेल. व्यवसाय व व्यवस्थापन, संगणन, कायदा, अभियांत्रिकी, कला आणि रेखन, जैवविज्ञान आणि सृष्टी विज्ञान अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातील.

 

 

* * *

N.Chitale/R.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2049960) Visitor Counter : 67