वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आयसीएआय च्या पश्चिम भारत प्रादेशिक परिषदेच्या 38 व्या प्रादेशिक परिषदेला केले संबोधित
गोयल यांनी सनदी लेखापालांना ‘विकसित भारत’चे राजदूत बनण्याचे, आधुनिक तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवण्याचे आणि कायदे सुलभ करण्यासाठी सूचना देण्याचे केले आवाहन
"आगामी काही वर्षांत, 4 लाखांहून अधिक सनदी लेखापाल भारताचे भविष्य घडवण्यात आघाडीवर असतील"
भारताची अर्थव्यवस्था आणि निर्यात वाढत आहे, वाढती आयात आर्थिक समृद्धी आणि मागणीची दर्शक आहे : गोयल
Posted On:
23 AUG 2024 10:48PM by PIB Mumbai
मुंबई, 23 ऑगस्ट 2024
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईत, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) च्या पश्चिम भारत प्रादेशिक परिषदेच्या (WIRC) 38 व्या प्रादेशिक परिषदेत, भारताच्या आर्थिक विकासाच्या भविष्यातील मार्गाची रूपरेषा सांगणाऱ्या " विकसित भारत @ 2047 - मार्गदर्शक आराखडा" या विषयावर भाषण केले.

"भारतीय सनदी लेखापाल संस्थेने (ICAI) आम्हाला चांगले नागरिक बनण्यासाठी तयार केले आहे" असे स्वतः सनदी लेखापाल असलेल्या गोयल यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. कठोर अभ्यासक्रम, उच्च गुणवत्तेचा अभ्यासक्रम ज्यामध्ये संस्था सतत सुधारणा करत असते यामुळे हा एक असा व्यवसाय बनला आहे जो काळानुसार विकसित होतो आणि गोष्टींना जागतिक व्यापक दृष्टीकोनातून पाहण्यास मदत करतो, असेही ते म्हणाले. सीए आणि कायद्याचे विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतात ते त्यांना देशाची सेवा करण्यासाठी आणि देश स्वातंत्र्याचे शतक साजरे करताना भारतीय अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियन वरून 35 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी तयार करतात, असेही ते पुढे म्हणाले. सर्व सनदी लेखापालांनी विकसित भारताचे राजदूत व्हावे असे आवाहन गोयल यांनी केले. सनदी लेखापालांच्या मेहनतीमुळे देशाचा विकास होईल असेही ते म्हणाले. पुढील 6 ते 8 वर्षांत सनदी लेखापालांची संख्या 10 लाखांपर्यंत वाढेल, असेही ते म्हणाले. सनदी लेखापालांनी प्राप्तिकर कायदा आणि इतर कायदे तसेच काही तरतुदीं गुन्ह्याच्या सूचीतून वगळण्यासाठी आणि अनुपालन सुलभ करण्यासाठी आणि व्यवसाय करणे सुलभ बनवण्यासाठी टिप्पण्या आणि सूचना प्रदान करण्याचे आवाहन गोयल यांनी केले. त्यांनी नवोदित सनदी लेखापालानी कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप टेक, मशीन लर्निंग आणि सर्व नवीन तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवण्याचा सल्ला दिला.
HRB9.jpeg)
"आगामी काही वर्षांमध्ये, 4 लाखांहून अधिक सनदी लेखापाल भारताचे भविष्य घडवण्यात आघाडीवर असतील" असे गोयल यांनी भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या सदस्यांना संबोधित करताना सांगितले. भारताचा विकास करण्यासाठी देशातील शेतकरी, कारखानदार, डॉक्टर, अभियंते आणि विविध व्यावसायिक काम करत आहेत, असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, विकसित देश आज मंदी आणि वाढत्या महागाईचा सामना करत असताना, भारत जगात सुरक्षित स्थानावर आहे. भारत हा वाळवंटातील ओएसिस प्रमाणे आहे", ते म्हणाले.
त्यांनी माहिती दिली की आयएमएफ (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) ने भारताचा विकास दर 7 टक्के राहील असा अंदाज नुकताच वर्तवला आहे. "भारताने दुहेरी अंकात वृद्धी दर नोंदवावा, अशी मी अशा करतो", ते पुढे म्हणाले.
मौद्रिक आणि वित्तीय धोरणांच्या संयोजनाने, भारतात महागाई नियंत्रणात ठेवली जाते, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणाले.
जगभरात विविध ठिकाणी युद्धे सुरु असूनही भारताची अर्थव्यवस्था आणि निर्यातीमध्ये वृद्धी होत आहे. आयात देखील वाढत आहे जी आर्थिक समृद्धी आणि मागणी दर्शवते, ज्यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि देशात अधिक रोजगार निर्माण होईल."आपण एक मजबूत व्यापक आर्थिक परिस्थिती प्राप्त करण्यासाठी सक्षम आहोत. जागतिक संस्थांनी भारताच्या विकास गाथेवर विश्वास दर्शवला आहे", केंद्रीय मंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत, अर्थव्यवस्थेची भव्य इमारत उभारण्यासाठी एक मजबूत पाया घातला गेला आहे, जिथे मूलभूत गरजा पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि 1.4 अब्ज भारतीय उज्ज्वल भविष्य साकारण्याचे स्वप्न पाहत आहेत.
भारत आता कमकुवत राहिलेला नाही आणि भारतीय पासपोर्टला जगभरात आदर मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले. देशवासीयांमध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या कणखर नेतृत्वामुळे जगातील कोणतीही शक्ती भारताला रोखू शकत नाही, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अर्थव्यवस्थेने नाजूक पाच वरून जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांपर्यंत झेप घेतली आहे. भारताच्या उज्ज्वल आणि चमकदार भविष्याचा पाया रचला गेला आहे, असेही ते म्हणाले.
“सशक्त सीए – विकसित भारत” या संकल्पनेवर ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिष चौहान, SEBI चे WTM अश्वनी भाटिया, एसबीआय चे अध्यक्ष दिनेश कुमार खारा, आणि उद्योग, सरकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आज सकाळी या परिषदेचे उद्घाटन झाले.
इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) ही भारतातील चार्टर्ड अकाउंटंट्सच्या व्यवसायाचे नियमन आणि विकासासाठी, चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा, 1949 अंतर्गत संसदेच्या कायद्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली वैधानिक संस्था आहे. ही संस्था भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रशासकीय देखरेखीखाली काम करते आणि संस्थेचे सध्या 9.85 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि 4 लाखांहून अधिक सदस्य आहेत.
ICAI चे भारतात 5 प्रादेशिक परिषदा आणि 176 शाखांसह, जगभरातील 47 देशांमधील 81 शहरांमधील 50 आंतरराष्ट्रीय आणि 31 प्रतिनिधी कार्यालयांचे विस्तृत नेटवर्क आहे. WIRC ही पाच प्रादेशिक परिषदांपैकी एक असून, ती मुंबईत आहे.
N.Chitale/S.Mukhedkar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2048384)
Visitor Counter : 70