संरक्षण मंत्रालय
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय लष्कराच्या क्रीडापटूंचा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला सत्कार
Posted On:
16 AUG 2024 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भारतीय लष्कराच्या क्रीडापटूंचा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, यांनी सत्कार केला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक येथे हा समारंभ आयोजित करण्यात आला आणि हा समारंभ केवळ या खेळाडूंच्या कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी नव्हता तर देशातील क्रीडा प्रतिभेची जोपासना करण्यासाठी भारतीय लष्कराने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचा सन्मान करण्यासाठी होता.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाने एकूण सहा पदके (एक रौप्य आणि पाच कांस्य) पटकावली, ज्यामध्ये भारतीय लष्करातील सुभेदार मेजर नीरज चोप्रा यांनी भारतासाठी भालाफेकीत जिंकलेल्या एकमेव रौप्य पदकाचा समावेश आहे. या असाधारण कामगिरीची ऑलिम्पिक खेळांमधील भारतीय सैन्याच्या सर्वात उल्लेखनीय प्रदर्शनांपैकी एक म्हणून नोंद झाली आहे. भारतीय लष्कराच्या सेवेतील खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः
- सुभेदार,मेजर नीरज चोप्रा, पीव्हीएसएम, व्हीएसएम ऍथलेटिक्समध्ये(भालाफेक) रौप्य पदक.
- सुभेदार बोम्मनदेवरा धीरज- तीरंदाजीत(रिकर्व प्रकारात) चौथा क्रमांक.
2036 च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारताकडून आपली दावेदारी सादर करण्याची सज्जता सुरू असताना, भारतीय लष्कर ऑलिम्पिकमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठीच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या दिशेने एका महत्त्वाच्या घडामोडीत, क्रीडा गुणवत्ता ओळखण्यासाठी आणि तिची जोपासना करण्यासाठी भारतीय लष्कराने 2001 मध्ये आपली मिशन ऑलिम्पिक विंग (MOW) या विभागाची स्थापना केली. तरुणांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि त्यांना जागतिक उत्कृष्टतेकडे नेण्यासाठी, भारतीय लष्कराने दोन गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी आणि 18 बॉईज स्पोर्ट्स कंपनी स्थापन केल्या आहेत. युवा क्रीडापटूंना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी आणि उच्च स्तरावर स्पर्धा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उपक्रमांचा उद्देश आहे.
पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये पहिल्यांदाच भारतीय लष्कराकडून हवालदार जस्मीन ही महिला क्रीडापटू मुष्टीयुद्धात सहभागी झाली. आशियायी क्रीडास्पर्धा 2023 मध्येही भारतीय लष्कराच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 10 कांस्य अशी तब्बल 20 पदकांची कमाई केली होती.
भारतीय लष्कराच्या क्रीडापटूंच्या अशा प्रकारच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लष्करप्रमुखांनी अभिमान व्यक्त केला आहे. त्यांची शिस्त, चिकाटी आणि समर्पित वृत्ती भारतीय लष्कराच्या मूलभूत मूल्यांचे प्रतीक आहे. त्यांच्या कामगिरीने केवळ बहुमानच प्राप्त केलेला नाही तर इतर असंख्य लोकांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले आहे. भारतीय लष्कर देशासाठी सामर्थ्य, शौर्य आणि शिस्त यांचा एक स्तंभ म्हणून उभे असून, आपल्या सीमांचे रक्षण करण्याच्या आपल्या प्राथमिक उद्दिष्टापलीकडे, लष्कर सातत्याने खेळांसहित विविध सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये आपल्या बांधिलकीचे दर्शन घडवत आहे, राष्ट्र उभारणीत सर्वांगीण योगदान देत आहे. भारतीय लष्करातील खेळाडू उत्कृष्टतेचा शोध सुरू ठेवतील आणि आगामी काळात यशाची आणखी शिखरे सर करतील असा विश्वास लष्करप्रमुखांनी व्यक्त केला आहे.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2046056)
Visitor Counter : 55